शॉर्टसर्किटने कारसह साहित्याचे नुकसान
बेळगाव ; सिग्नलजवळ थांबलेल्या कारला शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना सोमवारी सायंकाळी 7 च्या सुमारास घडली. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. या घटनेत कार आणि कारमधील साहित्य जळून खाक झाले आहे. गोवा येथून बेळगावमध्ये खरेदीनिमित्त आलेल्या या कारला आग लागल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूर सर्कलजवळ ही घटना घडली. गाडीमधून धूर येत असल्यामुळे तातडीने त्यामधील सर्वजण बाहेर पडले. बघताबघता कारने पेट घेतला. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी फवारा मारून आग आटोक्यात आणली. मात्र कार आणि त्यामधील साहित्य पूर्णपणे जळाले होते. या घटनेमुळे या परिसरात पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. अशा घटना वारंवार घडत आहेत, अशी चर्चा यावेळी सुरू होती.









