वृत्तसंस्था/ चेन्नई
न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विलियम्सनला गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दुखापती समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मध्यंतरी त्याला पाठदुखापतीची समस्या चांगलीच जाणवत होती. या दुखापतीतून तो बरा झाल्याने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील शुक्रवारी झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात आपला सहभाग दर्शवला होता पण या सामन्यात खेळताना त्याच्या हाताच्या अंगठ्याला पुन्हा दुखापत झाल्याने तो या स्पर्धेतील पुढील तीन सामन्यात खेळू शकणार नाही, असे न्यूझीलंडच्या संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
गेल्या मार्चमध्ये आयपीएल स्पर्धेत खेळताना सामन्यात विलियम्सनला पहिल्यांदा दुखापत झाली होती. या दुखापतीतून बरे होण्यासाठी त्याला किमान सात महिने क्रिकेटपासून अलिप्त राहावे लागले होते. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात विलियम्सन खेळू शकला नाही. बांगलादेशविरुद्धच्या चेन्नईच्या सामन्यात विलियम्सनने 78 धावांची खेळी केली. त्यानंतर दुखापतीमुळे त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला होता.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडचा पुढील सामना 18 ऑक्टोबरला अफगाणबरोबर, धर्मशाला येथे 22 ऑक्टोबरला भारताबरोबरचा सामना तसेच 28 ऑक्टोबरला पुणे येथे होणाऱ्या दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात विलियम्सन खेळू शकणार नाही. या दुखापतीची स्थिती अद्याप स्पष्ट झाली नसली तरी त्याच्या अंगठ्याचे हाड मोडल्याने त्याला पुन्हा क्रिकेटपासून अलिप्त राहावे लागेल असा अंदाज आहे.









