दुसरी कसोटी, ऑस्ट्रेलियाला 73 धावांची आघाडी
वृत्तसंस्था / गॅले
कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि अॅलेक्स कॅरे यांच्या नाबाद शतकांच्या जोरावर त्याच प्रमाणे अभेद्य द्विशतकी भागिदारीने येथे सुरु असलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत बलाढ्या ऑस्ट्रेलियाने यजमान लंकेवर पहिल्या डावात 73 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर पहिल्या डावात 3 बाद 330 धावा जमविल्या असून तत्पूर्वी लंकेचा पहिला डाव 257 धावांवर ऑटोपला.
या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिली कसोटी जिंकून लंकेवर यापूर्वीच आघाडी मिळविली आहे. या दुसऱ्या कसोटीत यजमान लंकेने गुरुवारी खेळाच्या पहिल्या दिवसअखेर 9 बाद 229 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरुन त्यांनी दुसऱ्या दिवसाच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि शेवटच्या जोडीने 28 धावांची भर घातली. कुहेनमनने कुमाराला 2 धावांवर झेलबाद करत लंकेला 97.4 षटकात 257 धावांवर रोखले. कुशल मेंडीसने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 139 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 85 धावा झळकविल्या. लंकेच्या पहिल्या डावात चंडीमल आणि कुशल मेंडीस यांनी अर्धशतके नोंदविली. ऑस्ट्रेलियातर्फे स्टार्क, कुहेनमन आणि लियॉन यांनी प्रत्येकी 3 तर हेडने 1 गडी बाद केला. शुक्रवारी केवळ 30 मिनिटांच्या कालावधीत लंकेचा पहिला डाव समाप्त झाला.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाला सावध सुरूवात झाली. ख्वॉजा आणि हेड यांनी सलामीच्या गड्यासाठी 32 धावांची भागिदारी केली. लंकेच्या पेरीसने हेडला झेलबाद केले. त्याने 22 चेंडूत 3 चौकारांसह 21 धावा जमविल्या. त्यानंतर प्रभात जयसुर्याने लाबुशेनला 4 धावांवर पायचित केले. ऑस्ट्रेलियाची यावेळी स्थिती 2 बाद 37 अशी होती. उपाहारावेळी ऑस्ट्रेलियाने 21 षटकात 2 बाद 85 धावा जमविल्या होत्या. ख्वाजा 34 तर स्मिथ 23 धावांवर खेळत होते.
खेळाच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाला. दरम्यान ख्वाजा आणि स्मिथ यांनी तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी 91 चेंडूत पूर्ण केली. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 54 धावांची भर घातली. पेरीसने ख्वाजाला पायचित झाले. त्याने 57 चेंडूत 3 चौकारांसह 36 धावा जमविल्या. कर्णधार स्मिथ आणि कॅरे यांनी संघाचा डाव चांगलाच सावरला. या जोडीने चहापानावेळी आपल्या संघाला 50 षटकाअखेर 3 बाद 197 धावापर्यंत नेले. या जोडीने खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये चौथ्या गड्यासाठी अभेद्य 108 धावांची भागिदारी केली. स्मिथने 98 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 50 तर कॅरेने 68 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले.
चहापानानंतर या जोडीने आक्रमक फटकेबाजीवर अधिक भर दिला. खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये या जोडीने 133 धावांची भर घातली. या जोडीने चौथ्या गड्यासाठी अभेद्य 239 धावांची भागिदारी केली. स्मिथने 191 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह तर कॅरेने 118 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह शतक झळकविले. या जोडीने द्विशतकी भागिदारी 279 चेंडूत नोंदविली. ऑस्ट्रेलियाचे त्रिशतक 72 षटकात फलकावर लागले. लंकेच्या गोलंदाजांना ही जोडी खेळाच्या शेवटसत्रामध्ये फोडता आली नाही. दिवसअख्घेर ऑस्ट्रेलियाने 80 षटकात 3 बाद 330 धावा जमविल्या. स्मिथ 239 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 120 तर कॅरे 156 चेंडूत 2 षटकार आणि 13 चौकारांसह 139 धावांवर खेळत आहे. लंकेतर्फे पेरीसने 2 तर जयसुर्याने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : लंका प. डाव 97.4 षटकात सर्वबाद 257 (कुशल मेंडीस नाबाद 85, चंडीमल 74, करुणारत्ने 36, रमेश मेंडीस 28, निशांका 11, कमिंदु मेंडीस 13, अवांतर 7, स्टार्क, कुहेनमन, लायन प्रत्येकी 3 बळी, हेड 1-31), ऑस्ट्रेलिया प. डाव 80 षटकात 3 बाद 339 (स्मिथ खेळत आहे 120, कॅरे खेळत आहे 139, हेड 21, ख्वाजा 36, लाबुशेन 4, अवांतर 10, पेरीस 2-70, जयसुर्या 1-107),









