वृत्तसंस्था/ बेंगळूर
2023 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरू झालेल्या यजमान कर्नाटक आणि सौराष्ट्र यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यात कर्णधार मयांक अगरवालच्या नाबाद शतकाच्या जोरावर कर्नाटकाने पहिल्या डावात दिवसअखेर 87 षटकात 5 बाद 229 धावा जमवल्या. अगरवाल 110 धावावर खेळत असून श्रीनिवास शरथ 58 धावावर खेळत आहे.
या सामन्यात सौराष्ट्रने नाणेफेक जिंकून कर्नाटकाला प्रथम फलंदाजी दिली. सौराष्ट्रच्या भेदक गोलंदाजीसमोर कर्नाटकाचा निम्मा संघ 40.3 षटकात 112 धावात तंबूत परतला होता. त्यानंतर कर्णधार अगरवाल आणि शरथ या जोडीने सहाव्या गडय़ासाठी 117 धावांची अभेद्य भागीदारी केली. या कामगिरीमुळे कर्नाटकाचा पहिला डाव सावरला गेला. मयांक अगरवालने 246 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारासह नाबाद 110 धावा झळकवल्या. तर शरथने 143 चेंडूत 4 चौकारासह नाबाद 58 धावा जमवल्या. कर्नाटकाच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. डावातील सहाव्या षटकात सलामीचा रवीकुमार समर्थ पटेलच्या गोलंदाजीवर जडेजाकरवी झेलबाद झाला. त्यानंतर देवदत्त पडीकल सकारियाच्या गोलंदाजीवर जॅक्सनकडे झेल देत तंबूत परतला. अगरवाल आणि जोस यांनी तिसऱया गडय़ासाठी 47 धावांची भागीदारी केली. पटेलने जोसला 18 धावावर झेलबाद केले. मनीष पांडे अधिक धावा जमवू शकला नाही. मंकडने त्याला बाद केले. श्रेयस गोपाल 15 धावावर असताना एकेरी धाव घेण्याच्या नादात धावचित झाला.
संक्षिप्त धावफलक
कर्नाटक प. डाव 87 षटकात 5 बाद 229 (मयांक अगरवाल खेळत आहे 110, एस. शरथ खेळत आहे 58, श्रेयस गोपाल 15, निकीन जोस 18, के. पटेल 2-64, सकारिया आणि मंकड प्रत्येकी एक बळी).