एका दहशतवाद्याचा खात्मा : अन्य तिघांशी दिवसभर संघर्ष
वृत्तसंस्था / दोडा
जम्मू-काश्मीरच्या दोडा येथील सीमाक्षेत्रातील संघर्षात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे. मात्र, भारतीय सेनेच्या राष्ट्रीय रायफल्सच्या एका कॅप्टनलाही हौतात्म्य प्राप्त झाले आहे. ही चकमक या प्रदेशाच्या वनप्रदेशात घडली. मंगळवारी रात्रभर चाललेला हा संघर्ष बुधवारी दुपारपर्यंत चाललेला होता. याच परिसरात घुसखोरी केलेल्या अन्य तीन दहशतवाद्यांशी बुधवारी दिवसभर सुरक्षा जवानांचा संघर्ष सुरू होता.
या भागातून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय सेनेने हे अभियान चालविलेले आहे. या प्रदेशातील सीमावर्ती वनविभागात अनेक पाकिस्तान प्रशिक्षित दहशतवादी दडलेले असल्याची माहिती गुप्तचरांनी दिल्यानंतर या भागाला वेढा घालण्यात आला आहे. वनप्रदेशात खोलवर जाऊन सैनिक दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. दहशतवाद्यांनी अचानक गोळीबाराचा प्रारंभ केल्याने हा संघर्ष उद्भवला, अशी माहिती भारतीय सेनेच्या प्रवक्त्याने दिली. भारतीय सेना आणि राष्ट्रीय रायफल्सच्या संयुक्त तुकडीने या भागात देखरेख चालविली आहे.
दहशतवाद्याचा मृददेह ताब्यात
ठार झालेल्या दहशतवाद्याचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडला आहे. मृतदेहाजवळ असलेला मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. असार या भागात हा मृतदेह सापडला आहे. ठार झालेला दहशतवादी सीमापारच्या भागातून येथे आला होता. आणखी तीन दहशतवादी याच भागात असल्याचा संशय असून दिवसभर शोधमोहीम सुरू होती. चकमक सुरु झाल्यानंतर या भागात सैनिकांची संख्या वाढविण्यात आली आहे. दहशतवाद्याची ओळख पटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
सातवी मोठी चकमक
गेल्या दोन महिन्यांमधील दोडा क्षेत्रातील ही सैनिक आणि दहशतवादी यांच्यातील सातवी मोठी चकमक होती. दोडा वनक्षेत्र पिंजून काढून सर्व दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्याची भारतीय सेनेची योजना आहे. उधमपूर भागातही सैनिकांनी मोठे अभियान हाती घेतले आहे. या भागातही पाकिस्तान प्रशिक्षित दहशतवाद्यांनी बस्तान बसविले आहे. मात्र, त्यांचा फैलाव काश्मीरच्या इतर भागांमध्ये होण्यापूर्वीच त्यांना नष्ट करण्याची योजना तयार करण्यात आली आहे.
सेनेला पूर्ण स्वातंत्र्य
काश्मीर आणि सीमेवरील इतर भागांमधून दहशतवाद्यांचा संपूर्ण नायनाट करण्यासाटी भारतीय सेनेला संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून ही बाब स्पष्ट करण्यात आली. दहशतवाद्यांविरोधातील संघर्ष दीर्घकालीन असून सेनेने सीमांचे संरक्षण करण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र, हा दुर्गम प्रदेश असल्याने दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांना नायनाट करण्यासाठी वेळ लागणे स्वाभाविक आहे. तथापि, त्यांना पूर्ण संपविल्याशिवाय अभियान थांबवले जाणार नाही, अशी माहिती भारतीय सेनेच्या प्रवक्त्याने बुधवारी दिली.









