वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
कर्णधार ऍरोन फिंचच्या समयोचित आकर्षक अर्धशतक व भेदक गोलंदाजीच्या जोरावर सोमवारी येथे खेळविण्यात आलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील गट-1 मधील सामन्यात विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियाने आयर्लंडचा 42 धावांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. फिंचला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 5 बाद 179 धावा जमविल्या. त्यानंतर आयर्लंडचा डाव 18.1 षटकात 137 धावात आटोपला. गेल्या काही दिवसांपूर्वी कर्णधार फिंचला स्नायूदुखापत झाल्याने तो फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत होता. या महत्त्वाच्या स्पर्धेत सोमवारच्या सामन्यात अर्धशतक झळकावून त्याला सूर मिळाल्याचे दिसून आले. या स्पर्धेच्या गट-1 मधील गुणतक्त्यात ऑस्ट्रेलियाने चार सामन्यातून 5 गुण मिळवित दुसऱया स्थानावर झेप घेताना इंग्लंडला मागे टाकले आहे. आता या गटात न्यूझीलंडचा संघ पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा या गटातील आता शेवटचा सामना ऍडलेडमध्ये शुक्रवारी अफगाणबरोबर होणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या डावात कर्णधार फिंचने 44 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 63 धावा जमविताना मिचेल मार्ससमवेत दुसऱया गडय़ासाठी 52 धावांची भागीदारी केली. तत्पूर्वी सलामीचा वॉर्नर डावातील तिसऱया षटकात 3 धावांवर बाद झाला. मार्शने 22 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 28 धावा जमविल्या. स्टोईनिसने 25 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 35 तर मॅक्सवेलने 9 चेंडूत 1 षटकारासह 13 धावा जमविल्या. टीम डेव्हिडने 10 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 15 तर वेडने 1 चौकारासह नाबाद 7 धावा केल्या. स्टोईनिस आणि फिंच यांनी चौथ्या गडय़ासाठी 70 धावांची भागीदारी केली. कर्णधार फिंच डावातील 17 व्या षटकात मॅकार्थीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. आयर्लंडच्या मॅकार्थीचा हा तिसरा बळी ठरला. तत्पूर्वी मॅकार्थीने वॉर्नर आणि मार्श यांना बाद केले होते. ऑस्ट्रेलियाच्या डावात 7 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. आयर्लंडतर्फे मॅकार्थीने 29 धावात 3 तर लिटलने 21 धावात 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना आयर्लंडच्या डावात लॉर्कन टकरचे नाबाद अर्धशतक वाया गेले. टकरने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 48 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 71 धावा झळकविल्या. टकरला संघातील इतर फलंदाजांकडून साथ मिळू शकली नाही. पॉल स्टर्लिंगने 7 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 11, कर्णधार बलबिर्नीने 1 षटकारासह 6, टेक्टरने 1 चौकारासह 6, डेलॅनीने 2 चौकारांसह 14, ऍडेरने 1 चौकारासह 11 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियातर्फे पॅट कमिन्स, मॅक्सवेल, स्टार्क आणि झाम्पा यांनी प्रत्येकी 2 तर स्टोईनिसने 1 गडी बाद केला. आयर्लंडच्या डावामध्ये 3 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. या स्पर्धेत गट-1 मध्ये इंग्लंडचा संघ तिसऱया स्थानावर आहे.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया 20 षटकात 5 बाद 179 (फिंच 63, मार्श 28, स्टोईनिस 35, डेव्हिड नाबाद 15, मॅक्सवेल 13, मॅकार्थी 3-29, लिटल 2-21), आयर्लंड 18.1 षटकात सर्वबाद 137 (टकर नाबाद 71, स्टर्लिंग 11, डेलॅनी 14, ऍडेर 11, कमिन्स 2-28, मॅक्सवेल 2-14, स्टार्क 2-43, झाम्पा 2-19, स्टोईनिस 1-6).









