वृत्तसंस्था / बेकेनहॅम
शनिवारपासून येथे सुरू झालेल्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या भारत आणि इंग्लंड संघादरम्यानच्या पहिल्या कसोटीत शेवटची बातमी हाती आली त्यावेळी भारतीय युवा संघाला 54 षटकात 4 बाद 298 धावा जमविल्या होत्या. कर्णधार आयुष म्हात्रेने दमदार शतक (102) तर मल्होत्रा आणि राहुल कुमार यांनी दमदार अर्धशतके नोंदविली.
हा पहिला कसोटी सामना 4 दिवसांचा खेळविला जात आहे. या पहिल्या सामन्यात भारतीय युवा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आक्रमक फटकेबाजी करणारा वैभव सूर्यवंशी चौथ्या षटकात बाद झाला. वैभवने 13 चेंडूत 3 चौकारांसह 14 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार म्हात्रे आणि मल्होत्रा यांनी संघाचा डाव सावरताना दुसऱ्या गड्यासाठी 173 धावांची भागिदारी केली. कर्णधार म्हात्रेने 115 चेंडूत 2 षटकार आणि 14 चौकारांसह 102 धावा झळकविल्या. मल्होत्राने 99 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 67 धावा जमविल्या. चेवडा 11 धावांवर बाद झाला. भारताची यावेळी स्थिती 4 बाद 206 अशी होती. कुंडू आणि राहुलकुमार यांनी संघाला बऱ्यापैकी स्थितीत नेताना पाचव्या गड्यासाठी अभेद्य 92 धावांची भागिदारी केली. कुंडू 5 चौकारांसह 41 तर राहुल कुमार 1 षटकार आणि 10 चौकारांसह 50 धावांवर खेळत आहेत. इंग्लंड युवा संघातर्फे अॅलेक्स ग्रीनने 29 धावांत 2 तर वॉनने 88 धावांत 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : भारत युवा संघ प. डाव 54 षटकात 4 बाद 298 (आयुष म्हात्रे 102, मल्होत्रा 67, राहुल कुमार खेळत आहे 50, कुंडू खेळत आहे 41, चवडा 11, सूर्यवंशी 14, अवांतर 13, ग्रीन 2-29, वॉन 2-88)









