वृत्तसंस्था/ अमृतसर
2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीदरम्यान भाजप केंद्रीय मंत्रिमंडळ आणि संघटनेत फेरबदलासह तीन राज्यांमध्ये राज्यपाल बदलू शकते. जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदासाठी सध्या पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नाव चर्चेत आहे. 2020 मध्ये राज्यपाल झालेल्या मनोज सिन्हा यांच्या जागी कॅप्टनअमरिंदर सिंग यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्याचा विचार सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची चर्चाही सुरू झाली होती, मात्र नंतर ती संपुष्टात आली.
लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन-तीन राज्यपालांना हटवण्याचा मोदी सरकार विचार करत आहे. यामध्ये जम्मू-काश्मीरसोबत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याबाबतही विचार सुरू आहे. आता नव्या राज्यपालांच्या नियुक्त्यांमध्ये पुन्हा पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नावही घेतले जात आहे. अमरिंदर सिंग हे सध्या 81 वर्षांचे आहेत. काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी स्थापन केलेला प्रादेशिक पक्ष विसर्जित करून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. कॅप्टन अमरिंदर सिंग हे भाजपच्या सभांमध्ये फारसे दिसत नाहीत, पण त्यांची मुलगी जैंदर कौर मात्र खूप सक्रिय असल्याचे दिसते. जैंदर कौर स्वत: राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय बैठकांना उपस्थित राहतात.









