कुंकळ्ळी, आमोणेत हवेची गुणवत्ता सर्वात वाईट : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अभ्यासातून स्पष्ट
पणजी : राजधानी पणजी हे सर्वाधिक प्रदूषित शहर असल्याचे समोर आले आहे. पणजीसह राज्यातील सहा शहरांमध्ये हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट असून त्यात कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत आणि मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील आमोणे खाण क्षेत्र यांचा समावेश आहे. विधानसभेत सादर करण्यात आलेल्या राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अभ्यासातून हे निष्कर्ष समोर आले आहेत. या अहवालात एप्रिल 2022 आणि मार्च 2023 दरम्यान संपूर्ण गोव्यात असलेल्या 19 नॅशनल एअर मॉनिटरिंग प्रोग्राम साईट्सवरील हवा गुणवत्ता दर्जा तपासणी डेटाचा तपशील देण्यात आला आहे. पणजीचे पीएम 10 सांद्रता आता 68 जी/मायक्रोन 3 आहे. पीएम 10 म्हणजे 10 मायक्रॉन किंवा त्यापेक्षा कमी व्यासाचे (पीएम10) हवेतील कण, ज्यांचा एखाद्याच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीचे पीएम 10 रेटिंग 72 आहे, आणि सांखळी आमोणे खाण क्षेत्र सर्वात प्रदूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हापसा, मडगाव, वास्को, फोंडा आदी शहरे आणि खाण परिसर असलेल्या डिचोली व तिळामळ या क्षेत्रांमध्ये धूळ कण पदार्थ मर्यादा मान्य मर्यादेपेक्षा खूपच कमी असल्याचे दिसून आले आहे. ओझोन (ओ 3), शिसे (पीबी), आणि कार्बन मोनोऑक्साईड (सीओ) सारख्या पॅरामीटर्सचे देखील या ठिकाणी परीक्षण करण्यात आले आणि ते विहित मर्यादेत आढळले, असे अहवालात म्हटले आहे.









