मान्यवरांच्या उपस्थितीत होणार चषकाचे अनावरण : नाट्या परंपरेला गतवैभव मिळवून देणार
बेळगाव : कॅपिटल वन सोसायटीच्यावतीने आयोजित केलेल्या एकांकिका स्पर्धांना शनिवार दि. 4 पासून प्रारंभ होणार आहे. कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर येथे दोन दिवस स्पर्धा होणार आहे. सलग 13 व्या वर्षी कॅपिटल वन संस्थेने स्पर्धेचे आयोजन करत बेळगावमधील नाट्या परंपरेला गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. चषकाचे अनावरण शनिवार दि. 4 रोजी सायंकाळी 5 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रवेश पूर्णत: मोफत असून नाट्याप्रेमींनी स्पर्धांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन चेअरमन शिवाजी हंडे यांनी केले आहे. परीक्षक म्हणून रवीदर्शन कुलकर्णी, केदार सामंत व यशोधन गडकरी काम पाहणार आहेत.
त्यांचा अल्पपरिचय पुढीलप्रमाणे-
रवीदर्शन कुलकर्णी (कोल्हापूर)-कोल्हापूर येथील नाट्याकलाकार रवी यांनी झुलता पूल, महापौर, राईट युवर, भूमितीचा फार्स या एकांकिकांमधून अभिनय केला आहे. छळछावणी, यशोधरा, तुघलक, द केअर टेकर, सारी रात्र, पाणी, तुका म्हणे अवघे सोंग या एकांकिकांचे दिग्दर्शन केले आहे. केदार सामंत (कुडाळ)-पडघम, तीन पैशांचा तमाशा, अशी पाखरे येती, स्वानंदी, संगीत लग्नकल्लोळ, सारे प्रवासी घडीचे, दुभंग, लोककथा, काळं बेट, लालबत्ती अशा गाजलेल्या नाटकातून केदार यांनी भूमिका वठवल्या आहेत. यापैकी बऱ्याच नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. यशोधन गडकरी (सांगली)-रक्त नको मज प्रेम हवे, सदू आणि दादू, झाडाझडती, सरहद्द, तारामंडळ, आम्ही सारेच घोडेगावकर, मंदारमाला इत्यादी नाटकातून त्यांनी अभिनय केला आहे. झाडाझडती या नाटकातील अभिनयासाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.









