ब्रिटिशकालीन गार्डनची दुरवस्था : उद्यानाचे अस्तित्वच नष्ट : शाळांच्या सहलीसाठी उपयुक्त ठिकाण : विकास करण्याची नागरिकांची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
कॅन्टोन्मेंट परिसराच्या विकासाबरोबर उद्यानांच्या सुशोभिकरणाचा प्रयत्न कॅन्टोन्मेंट बोर्डने केला होता. उद्यानांच्या विकासाकरिता लाखोच्या निधीची तरतूद केली होती. मात्र, उद्यानांचा विकास साधण्यात कॅन्टोन्मेंट बोर्डला अपयश आले आहे. कॅम्प परिसरात ब्रिटिशकालीन असलेल्या क्वीन्स गार्डनची दुरवस्था झाली आहे. लहान मुलांच्या खेळाच्या साधनांऐवजी संपूर्ण उद्यान गवत, झाडे झुडपांनी व्यापले असल्याने उद्यान नष्ट झाले आहे.
कॅन्टोन्मेंट व्याप्तीमध्ये अनेक खुल्या जागा आहेत. यापैकी काही खुल्या जागा उद्यानांसाठी राखीव आहेत. काही जागा क्रीडांगणासाठी राखीव आहेत. पण राखीवतेनुसार जागांचा वापर केला जात नाही. कारण कॅन्टोन्मेंटवतीने उद्यानांच्या विकासाकरिता निधीची तरतूद केली होती. मात्र, निधीचा वापर करून कोणत्या उद्यानाचा विकास केला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या कॅन्टोन्मेंटमधील काही मोजकी उद्याने वगळता अन्य उद्यानांची दुरवस्था झाली आहे. उद्यानामध्ये गवत आणि झाडेझुडपे वाढली असून सुशोभिकरणाऐवजी विद्रुपीकरण झाले आहे.
उद्यानाला अवकळा प्राप्त
शर्कत पार्कच्या मागील बाजूस ब्रिटिश काळात क्वीन्स गार्डन निर्माण करण्यात आले होते. सदर उद्यानात विविध प्रकारची झाडे असल्याने खुपच सुंदर आणि निसर्गरम्य होते. पण सध्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने उद्यानाची दुरवस्था झाली आहे. सदर उद्यान शांत असल्याने या ठिकाणी अभ्यासाकरिता मुलांची गर्दी होत असे. तसेच विविध शाळांच्या सहली आयोजित करण्यात येत होत्या. मात्र या ठिकाणी असलेले साहित्य खराब झाले असल्याने उद्यानाला अवकळा प्राप्त झाली आहे. प्रशस्त जागेत असल्याने ब्रिटिश काळात निर्माण करण्यात आल्याने उद्यानात नेहमी गर्दीत होत असे. पण सध्या देखभालीअभावी गवत, झाडेझुडपे वाढल्याने उद्यानाची दुर्दशा झाली आहे.
फिरावयास येणाऱयांना अडचण
उद्यानांचा विकास करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. पण निधी नसल्याने आणि सदर जागा लष्कराची असल्याचा दावा करण्यात आल्याने विकास करण्याचे रखडले आहे. गवत व झुडपांमुळे पहाटे आणि सायंकाळी फिरावयास येणाऱया नागरिकांना फिरण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. दुर्लक्षित असलेल्या आणि निसर्गरम्य असलेल्या क्वीन्स गार्डनच्या सुशोभिकरणाचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.









