बेळगाव : खानापूर येथे साई स्पोर्ट्स अकादमीतर्फे आयोजित आंतरशालेय सेव्हन ए साईड फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेळगावच्या कॅन्टोन्मेंट संघाने सर्वोदय खानापूर संघाचा 1-0 असा निसटता पराभव करून साई चषक पटकाविला.खानापूर येथे आयोजित या स्पर्धेत बेळगाव जिल्ह्यातील जवळपास 10 संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. बेळगावच्या कॅन्टोन्मेंट संघाने पहिल्या सामन्यात गजाननराव भातकांडे संघाचा 8-0 असा पराभव केला. कॅन्टोन्मेंटतर्फे अफताफ शेखने 2, आयन चोपदारने 2, अथर्व चौगुले, सुरेश रुपडी व अनिकेत यांनी प्रत्येकी 1 गोल केला. दुसऱ्या सामन्यात मराठी मंडळ खानापूरचा 4-0 असा पराभव केला. या सामन्यात अफताफ शेख, आयन चोपदार, अथर्व चौगुले व सुरेश यांनी प्रत्येकी 1 गोल केले. तिसऱ्या सामन्यात साई अकादमी खानापूर संघाचा 9-0 असा पराभव केला.
त्यात अफताप व आयन यांनी प्रत्येकी 3 गोल करून हॅट्ट्रीक साधली तर अथर्व व सुरेश व अनिकेत यांनी प्रत्येकी 1 गोल केला. उपांत्यफेरीच्या सामन्यात जैन हरिटेजचा 6-0 असा पराभव केला. त्यात सुरेश रुपडीने हॅट्ट्रीकसह 4 गोल तर अफताफ आणि आयन यांनी प्रत्येकी 1 गोल केला. अंतिम सामन्यात कॅन्टोन्मेंटने सर्वोदय खानापूरचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. पण दुसऱ्या सत्रात 20 व्या मिनिटाला आयन चोपदारच्या पासवर अफताब शेखने गोल करून संघाला 1-0 ची आघाडी मिळवून दिली. सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या कॅन्टोन्मेंट उपविजेत्या सर्वोदय खानापूर यांना चषक देऊन गौरविण्यात आले. या संघांना विजय संपादन केल्याबद्दल कॅन्टोन्मेंटचे सीईओ राजीवकुमार, मुख्याध्यापक के. जी. अमरावती, क्रीडाशिक्षक राकेश वाळवडे, सौरभ बिर्जे, संतोष दरेकर यांनी संघाचे अभिनंदन केले.









