ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते उद्घाटन
बेळगाव : कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड शाळेच्या मैदानावर उभारलेल्या टर्फ मैदानाचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते टर्फ मैदानाच्या तिन्ही विभागांचे उद्घाटन झाले. 2021 पासून रखडलेल्या प्रकल्पाला अखेर मंजुरी मिळाल्याने शाळेच्या विद्यार्थ्यांना फुटबॉलसह इतर सर्व खेळ अत्याधुनिक मैदानावर खेळता येणार आहेत. पुणे येथील बिटा स्पोर्ट्स क्लबकडे 2021 मध्ये कॅन्टोन्मेंट मैदानावर फुटबॉल मैदान बांधण्याचे कंत्राट दिले. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या मराठी, उर्दू, इंग्रजी माध्यम शाळांमधील विद्यार्थ्यांसह बाहेरील विद्यार्थ्यांनाही या ठिकाणी क्रीडा प्रशिक्षण घेता येणार होते. यासाठी 20 वर्षांचा करार केला. परंतु, हा करार चुकीचा असल्याने कॅन्टोन्मेंटचे नामनिर्देशित सदस्य सुधीर तुपेकर यांनी पुणे येथील सदर्न कमांडंटकडे तक्रार केली होती. त्यामुळे हा करार काही काळासाठी थांबविण्यात आला.
टर्फ मैदान बांधूनही चुकीच्या करारामुळे मैदान वापराविना पडून होते. यातून मार्ग काढण्यासाठी ऑक्टोबर 2024 मध्ये झालेल्या कॅन्टोन्मेंट बोर्ड बैठकीत बिटा स्पोर्ट्स कंपनीला कंत्राट दिले. परंतु, कंत्राट हे पाच वर्षासाठी असेल, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच बिटा कंपनीकडून प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये कॅन्टोन्मेंटला भाडे द्यावे लागणार आहे. या अटी कंपनीने मान्य केल्यानंतर कंपनीला कंत्राट देण्यात आले. अखेर टर्फ मैदानाचे सोमवारी उद्घाटन झाले. ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, कॅन्टोन्मेंटचे सीईओ राजीवकुमार, नामनिर्देशित सदस्य सुधीर तुपेकर यांच्यासह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.
‘तरुण भारत’च्या भूमिकेबद्दल कृतज्ञता
कॅन्टोन्मेंट बोर्ड शाळेमध्ये टर्फ मैदान उभारताना चुकीच्या पद्धतीने करार झाल्याचे पहिले वृत्त ‘तरुण भारत’ने प्रसिद्ध केले होते. वृत्त प्रसिद्ध झाले नसते तर आज कॅन्टोन्मेंटला महिन्याला पाच हजार रु. भाडे मिळालेच नसते. ‘तरुण भारत’ची ही बाजू नामनिर्देशित सदस्य सुधीर तुपेकर यांनी उचलून धरत 20 वर्षांचा करार 5 वर्षांचा केला. तसेच प्रत्येक महिन्याला कंपनीकडून कॅन्टोन्मेंट बोर्डला 5 हजार रु. भाडे देण्यासही भाग पाडले. ‘त. भा. ’च्या या भूमिकेबद्दल कृतज्ञता व्यक्त होत आहे.









