प्रलंबित कामांविषयी होणार का झटपट निर्णय?
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील काही महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डची बैठक तब्बल साडेतीन महिन्यांनंतर मंगळवार दि. 23 रोजी होणार आहे. कॅन्टोन्मेंटच्या माजी सीईओंची आत्महत्या व त्यानंतर झालेल्या घडामोडींनंतर प्रथमच बैठक होणार असल्याने ती वादळी ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रलंबित विकासकामांबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात कॅन्टोन्मेंट बोर्डची शेवटची बैठक झाली होती. साडेतीन महिने उलटले तरी अद्याप कॅन्टोन्मेंटची बैठक घेण्यात आली नसल्याने नाराजीचा सूर उमटत होता. अनेक विकासकामे प्रलंबित असून ती पूर्ण करण्याची मागणी होत होती. नोव्हेंबर महिन्यात कॅन्टोन्मेंटचे माजी सीईओ के. आनंद यांनी आपले जीवन संपविले. यानंतर अनेक सीईओ आले आणि काही दिवसातच निघूनही गेले. सध्या कॅन्टोन्मेंट बोर्डला राजीव कुमार हे कायमस्वरुपी सीईओ मिळाल्याने बोर्डची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मंगळवार दि. 23 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे.
वर्क ऑर्डरवर चर्चा होण्याची शक्यता
कॅन्टोन्मेंट बोर्डमधील रस्ते, गटारी, त्याचबरोबर इमारती देखभालीसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. निविदा काढण्यात आल्या असल्या तरी संबंधित कंत्राटदारांना वर्क ऑर्डर देण्यात आल्या नव्हत्या. त्याचबरोबर माजी सीईओंनी एका कर्मचाऱ्याला निलंबित केले होते. यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.









