मंगळवारऐवजी बुधवारी सकाळी 11.30 वाजता होणार बैठक : कॅन्टोन्मेंटचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डची निवडणूक जाहीर झाली आहे. मंगळवार दि. 21 रोजी सर्वसाधारण बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव ही बैठक एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे बुधवार दि. 22 रोजी सकाळी 11.30 वा. बैठक होणार आहे. मात्र याबाबतची माहिती कॅन्टोन्मेंटच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याकडे कॅन्टोन्मेंट प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. कॅन्टोन्मेंट बैठकीची तारीख लपविण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. बैठकीबाबतची माहिती प्रसिद्ध केल्यास कॅन्टोन्मेंट परिसरातील रहिवासी आणि माध्यम प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहतात. त्यामुळे बैठकीची माहिती देण्यास कॅन्टोन्मेंटकडून गुप्तता पाळली जाते. मंगळवार दि. 21 रोजी सकाळी 11 वा. कॅन्टोन्मेंटची बैठक आयोजित करण्यात आली होती. पण काही कारणास्तव ही बैठक एक दिवस उशिरा होणार आहे. बुधवार दि. 22 रोजी सकाळी 11.30 वा. बैठक आयोजित केली आहे. मात्र याबाबतची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली नाही. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या यापूर्वीच्या सर्व बैठकींचे इतिवृत्त कॅन्टोन्मेंटच्या संकेतस्थळावर अपलोड केले होते. मात्र 20 डिसेंबरनंतर कोणत्याच बैठकीची माहिती संकेतस्थळावर अपलोड केली नाही. बुधवारी होणाऱ्या बैठकीची तारीख व विषयपत्रिका संकेतस्थळावर अपलोड केली नाही. त्यामुळे बैठकीबाबतची माहिती लपविण्यामागचा उद्देश काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कॅन्टोन्मेंट परिसरात विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात नसल्याने समस्यांच्या तक्रारी करण्यास अडचण निर्माण झाली आहे. लोकनियुक्त सभागृहाची बैठक असल्यास नागरिकांना आपल्या समस्या मांडता येतात. पण बैठक कधी आहे? याबाबत कोणतीच माहिती दिली जात नाही. बैठकीत होणाऱ्या चर्चेची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी, याकरिता बैठकीचे थेट प्रक्षेपण करण्याची सूचना उच्च न्यायालयाने कॅन्टोन्मेंटला केली आहे. यानुसार बैठकीवेळी सभागृहात कॅमेरा सुरू केला जातो. पण माईक बंद ठेवले जाते. तर काहीवेळा माईक सुरू असते तर कॅमेरा बंद ठेवला जातो. बैठकीत झालेली चर्चेची माहिती नागरिकांना मिळू नये, याची खबरदारी घेण्याच्यादृष्टीने माईक किंवा कॅमेरा बंद ठेवण्याचा प्रकार केला जात असल्याची टीकाही नागरिक करीत आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्यादृष्टीने बैठकीत चर्चा केली जाते. तरीदेखील बैठकीतील चर्चा किंवा विषय लपविण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात असल्याने कॅन्टोन्मेंटचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.









