रखडलेली कामे पूर्ण करण्याकडे देणार भर
बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सीईओपदी नियुक्त झालेल्या विशाल सारस्वत यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. पहिल्याच दिवशी त्यांनी मागील महिन्याभरात प्रलंबित असलेल्या फाईल मागवून त्या चाळून पाहिल्या. त्यामुळे रखडलेल्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वीचे कॅन्टोन्मेंट सीईओ राजीवकुमार यांची जबलपूर येथे बदली झाली. त्यामुळे मागील महिनाभर कॅन्टोन्मेंट पद रिक्त होते. त्यांच्या जागी तात्पुरता पदभार बेंगळूर येथील कॅन्टोन्मेंटच्या प्रमुख दिव्या शिवराम यांच्याकडे सोपविण्यात आला होता. परंतु, त्या देखील काही दिवसांच्या सुटीवर गेल्यामुळे गणेश मंडळांसह अनेकांना अडचणी आल्या. त्यामुळे कायमस्वरुपी सीईओ देण्याची मागणी होत होती.
काही दिवसांपूर्वीच संरक्षण मंत्रालयाकडून बेळगाव कॅन्टोन्मेंटच्या सीईओपदी विशाल सारस्वत यांची नियुक्ती झाल्याचे पत्र जाहीर करण्यात आले. उत्तराखंड येथील हरिद्वार जिल्ह्यात रौकी कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये विशाल सारस्वत कार्यरत होते. त्यामुळे तेथील पदभार इतरांकडे देऊन ते बुधवारी बेळगावला आले. बुधवारी दुपारी त्यांनी कार्यालयात येऊन पदभार स्वीकारला. कॅन्टोन्मेंटमधील कारभाराची माहिती घेतली जात आहे. तसेच रखडलेली कामे लवकरच पूर्ण केली जातील, असे त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. त्यांच्या स्वागतासाठी कॅन्टोन्मेंटमधील विविध संघटना तसेच शाळांचे शिक्षक उपस्थित होते.









