मद्यपींचा वाढता वावर : अस्वच्छतेमुळे प्रवासी वैतागले, पोलिसांची गस्त वाढवावी
बेळगाव : बेळगाव रेल्वेस्थानकासमोरील कॅन्टोन्मेंट बसस्थानक मद्यपींचा अड्डा बनला आहे. सायंकाळनंतर याठिकाणी बसची वाहतूक कमी झाल्यानंतर अवैध प्रकारांना ऊत येत आहे. त्यामुळे या परिसरातील व्यापारीही वैतागले असून कारवाईची मागणी करीत आहेत. अस्वच्छता आणि मद्यपींचा त्रास होत असतानाही कॅन्टोन्मेंट प्रशासनाला मात्र याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. स्मार्ट सिटी अंतर्गत कॅन्टोन्मेंट बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले. त्यापूर्वी याठिकाणी गोवा, कोकण यासह कारवार, शिर्सी या भागात जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्या धावत होत्या. तर देसूर, गर्लगुंजी, तोपिनकट्टी, तीर्थकुंडये, किणये यासह ग्रामीण भागात जाणाऱ्या बस येथूनच धावत होत्या. परंतु नूतनीकरणानंतर यातील मोजक्याच सेवा सुरू आहेत. तसेच परिवहन मंडळाने येथील चौकशी केंद्रदेखील हटविल्याने प्रवासी संख्या अत्यंत कमी झाली आहे.
बसस्थानक स्मार्ट झाले परंतु अस्वच्छतेमुळे गलिच्छपणा वाढला. बसस्थानकाच्या परिसरात कचऱ्याचे ढीग, रिकाम्या प्लास्टिक व दारूच्या बाटल्या सर्वत्र दिसून येतात. त्याचबरोबर परगावाहून आलेले फिरते विक्रेते याच बसस्थानक परिसरात ठाण मांडून आहेत. तसेच मद्यपींचा वावर असल्यामुळे महिला वर्ग याठिकाणाहून ये-जा करण्यासही घाबरत आहेत. बसस्थानकातील अनेक खुर्च्या मोडून पडल्या असून दुकान गाळे बंद असल्याने त्याठिकाणी अवैध प्रकार सुरू आहेत. हे बसस्थानक सध्या कॅन्टोन्मेंट बोर्डकडे असून त्याची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांच्याकडेच आहे. परंतु कॅन्टोन्मेंट बोर्डच्या दुर्लक्षामुळे याठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. बसस्थानकाच्या आतील भागात कचऱ्याचा ढीग असून अस्वच्छतेमुळे प्रवाशांना फटका बसत आहे. त्यामुळे याठिकाणी पोलिसांची गस्त वाढवावी व कायमस्वरुपी सुरक्षा रक्षक नेमावा, अशी मागणी केली जात आहे.









