मासिक बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा
बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डमधील थकबाकी वाढत आहे. त्याचा परिणाम महसुलावर होत असून, थकबाकी वसुली करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. अंदाजे 50 ते 60 लाखांची थकबाकी असून ती वसूल झाल्यास विकासकामे राबविणे शक्य होणार आहे. घरपट्टी, पाणीपट्टी यासह दुकान गाळे, पार्किंगचे खुले भूखंड या सर्वांची थकबाकी येत्या काळात वसूल करण्यावर भर दिला जाईल, अशी चर्चा बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत करण्यात आली. कॅन्टोन्मेंट बोर्डची मासिक बैठक शुक्रवारी पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी होते. यावेळी कॅन्टोन्मेंटचे सीईओ विशाल सारस्वत, आमदार असिफ सेठ व कॅन्टोन्मेंटचे सरकारनियुक्त सदस्य सुधीर तुपेकर उपस्थित होते.
या बैठकी दरम्यान कॅन्टोन्मेंटमधील रखडलेल्या प्रकल्पांबाबत चर्चा करण्यात आली. कचरा उचल तसेच कंत्राटी पद्धतीने घेण्यात आलेले कर्मचारी याविषयी चर्चा झाली. अद्याप नवीन कंत्राट बोलाविण्यात आले नसल्याने आहे त्याच कंत्राटदाराला काही महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यासंदर्भात चर्चा झाली. प्रारंभी सर्व मान्यवरांनी कॅन्टोन्मेंटचे नवीन सीईओ विशाल सारस्वत यांचे स्वागत केले. त्याचबरोबर बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डला सिल्व्हर अवॉर्ड मिळाल्याबद्दल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. यापुढेही असे लोकाभिमुख प्रकल्प राबविण्याकडे भर दिला जाईल, असे सांगण्यात आले. तसेच नागरिकांचे प्रश्न लवकरात लवकर सोडविले जातील, असे विशाल सारस्वत यांनी सांगितले.
जन्मदाखल्यातील त्रुटींमुळे अडचणी
मिलिटरी हॉस्पिटल येथून जन्मदाखला देताना काही सैनिकांच्या मुलांच्या जन्मदाखल्यात त्रुटी आहेत. शाळांमध्ये प्रवेश घेताना जन्मदाखल्यातील त्रुटींमुळे अडचणी येत आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तब्बल वर्षभराचा कालावधी लागत आहे. मिलिटरी हॉस्पिटल हे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अंतर्गत येत असल्याने बोर्डने यावर तोडगा काढावा, अशी मागणी सदस्य सुधीर तुपेकर यांनी केली. यासंदर्भात आपण अधिकाऱ्यांशी चर्चा करू. तसेच सैनिकांनीही जन्मदाखल्यासाठी अर्ज करताना योग्य प्रकारे अर्ज भरावा, अशी सूचना ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी केली.









