देशातील 9 कॅन्टोन्मेंट बोर्डचा समावेश, बेळगाव मात्र अद्याप दूरच
प्रतिनिधी/ बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डचे महानगरपालिकेत हस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेला पुन्हा एकदा गती मिळाली आहे. देशातील 9 कॅन्टोन्मेंट बोर्डचे लवकरच स्थानिक नगरपालिकांमध्ये हस्तांतरण होणार आहे. टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून पहिल्या टप्प्यात 56 पैकी 9 कॅन्टोन्मेंटचे हस्तांतरण होणार आहे. मात्र या यादीत बेळगावचा समावेश नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डला हस्तांतरणासाठी अजून काही महिने विलंब होणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या दिल्ली येथील कार्यालयातून एक पत्र देहराडून, नसिराबाद, बबिना, फत्तेगड, देवलोली, क्लेमेंट टाऊन, अजमेर, मथुरा, शहाजहानपूर या कॅन्टोन्मेंट बोर्डना पाठविण्यात आले आहे. 9 जानेवारीपूर्वी या कॅन्टोन्मेंट बोर्डना बैठक घ्यावी लागणार असून संबंधित राज्य सरकारबरोबर अंतिम चर्चा होणार असल्याचे पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
कर्नाटकातील एकमेव असलेल्या बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डचे महापालिकेमध्ये हस्तांतरण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमध्ये कॅन्टोन्मेंटचे अधिकारी, महापालिका व जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांचा समावेश आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीतील मालमत्तांची नोंदणी व सर्वेक्षण करण्यात आले असून कोणता भाग नागरी वसाहतीमध्ये व कोणता भाग बंगलो एरियामध्ये येतो, यासंदर्भात सर्वेक्षण करण्यात आले.
महिनाभरापूर्वी या समितीची बैठक झाली. कॅन्टोन्मेंटचे हस्तांतरण झाल्यानंतर राज्य सरकारला येणारा खर्च व केंद्र सरकारकडून देण्यात येणारे अनुदान याचाही विचार केला जाणार आहे. त्यामुळे अद्याप हस्तांतरणाची प्रक्रिया दूर असल्याचे एकूणच चित्र दिसून येत आहे.








