बुधवारच्या अर्थ, कर स्थायी समिती बैठकीत होणार चर्चा : लवकरच विषय मार्गी लागण्याची चिन्हे
बेळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून होणार होणार म्हणून गाजत असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाचे लवकरच महापालिकेकडे हस्तांतर होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. कारण बुधवार दि. 16 रोजी आयोजित महापालिकेच्या अर्थ आणि कर स्थायी समिती बैठकीच्या विषय पत्रिकेवर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हस्तांतराचा विषय घेण्यात आला असून हस्तांतरबाबत बैठकीत चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे बुधवारच्या बैठकीकडे बेळगावकरांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील स्थायी समिती सभागृहात बुधवार दि. 16 रोजी दुपारी 3.30 वाजता अर्थ व कर स्थायी समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची नोटीस कौन्सिल विभागाकडून समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि अधिकाऱ्यांना शुक्रवार दि. 11 रोजी जारी करण्यात आली आहे.
सदर बैठकीत 24 जानेवारी 2025 रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त वाचून दाखवून विविध विषयांना मंजुरी दिली जाणार आहे. शहरातील फेरीवाल्यांकडून भू- भाडे वसूल करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा केली जाणार आहे. जाहिरात फलक, अशोकनगर येथील जलतरण तलाव भाडेकरार तत्त्वावर देखभाल करण्यासाठी देणे, त्याचबरोबर मुख्यत्वे कॅन्टोन्मेंट हद्दीतील बाजार एरिया, बंगलो एरिया, खुली जागा, मैदाने व इतर भाग महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. यासह अध्यक्षांच्या परवानगीवरून इतर विषयांवर चर्चा केली जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कॅन्टोन्मेंटचे महापालिकेकडे हस्तांतर करण्याबाबत चर्चा होत आहे. मात्र, त्यावर अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही. पण बुधवारच्या अर्थ व कर स्थायी समितीत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हस्तांतराबाबत चर्चा होणार असल्याने हा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत.









