18 दिवस उलटले तरी जागा रिक्त : विकासकामांवर परिणाम
बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये सीईओपद मागील 18 दिवसांपासून रिक्त आहे. संरक्षण मंत्रालयाकडून अद्याप नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात न आल्याने अनेक कामे खोळंबली आहेत. तुर्तास हा कारभार बेंगळूर येथून सांभाळला जात आहे. जोवर कायमस्वरुपी सीईओ मिळत नाही तोवर कामाला गती मिळणार नाही. यापूर्वीचे सीईओ राजीवकुमार यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये अनेक नव्या विकासकामांना मंजुरी दिली. काही कामे अद्याप सुरू आहेत. 30 जुलै रोजी त्यांची बदली जबलपूर येथील कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये झाली. त्यामुळे मागील 18 दिवसांपासून ही जागा रिक्त आहे.
तात्पुरता सीईओपदाचा कार्यभार बेंगळूर कॅन्टोन्मेंट बोर्डच्या डीईओ दिव्या शिवराम यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. परंतु त्यांनीही अद्याप बेळगावला भेट दिलेली नाही. त्यामुळे बोर्डमधील अनेक कामे मंजुरीविना थांबली आहेत. संरक्षण मंत्रालयाने अद्याप कोणत्याच अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे नावाची घोषणा झाल्यानंतर संबंधित अधिकारी पदभार स्वीकारण्यासाठी पुन्हा वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. मागीलवेळी सीईओ राजीवकुमार यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर तब्बल दीड महिन्याने ते बेळगावमध्ये आले होते. त्यामुळे कोणत्या नवीन अधिकाऱ्याची नेमणूक होणार हे पहावे लागणार आहे.
मासिक बैठक रखडली
प्रत्येक महिन्याला कॅन्टोन्मेंट बोर्डची मासिक बैठक घेतली जाते. जुलै महिन्यात ही बैठक झालेली नाही. त्यातच आता सीईओंच्या बदलीमुळे बैठक रखडली आहे. नवीन अधिकारी आल्यानंतरच विकास आढावा बैठक होणार असल्याने नागरिकांना अधिकाऱ्याची प्रतीक्षा आहे.









