4 मे रोजी आयोजित सर्वसाधारण सभा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डची निवडणूक लांबणीवर पडल्यानंतर नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी दि. 4 मे रोजी कॅन्टोन्मेंटची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने बैठक घेता येते का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्या निवडणुकीला आचारसंहितेचे ग्रहण लागण्याची शक्यता आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डची निवडणूक 30 एप्रिल रोजी घेण्यात येणार होती. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे देशातील 57 कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका रद्द करून लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. मात्र आगामी काळात निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. पण यादरम्यान कॅन्टोन्मेंट परिसरातील रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निवारण करण्याची जबाबदारी कॅन्टोन्मेंट बोर्डची आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या प्रशासकीय मंडळाची बैठक गुरुवार दि. 4 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असताना सर्वसाधारण सभा घेता येते का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. वास्तविक पाहता कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता काळात सर्वसाधारण सभा, बैठका व नव्या निविदा काढता येत नाहीत. आचारसंहिता कालावधीत कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेता येत नाहीत. त्यामुळे आचारसंहितेचे बंधन बैठकांना लागू आहे. तरीदेखील कॅन्टोन्मेंट बोर्डने दि. 4 मे रोजी सर्वसाधारण सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. आचारसंहितेच्या काळात बैठक घेता येत नाही. अत्यावश्यक किंवा पाणी समस्या आदींकरिता केवळ सूचना करून समस्यांचे निवारण करण्याचे अधिकार सभागृहाला असतात. त्यामुळे कॅन्टोन्मेंटची सर्वसाधारण सभा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.









