पुणे-बेंगळूर मार्गावरील हलगाजवळ अपघात
बेळगाव : आंब्यांची वाहतूक करणारा कँटर सोमवारी मध्यरात्री पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हलगा गावानजीकच्या सिमेंट गोडावूनजवळ पलटी झाला. केवळ सुदैवानेच कोणतीही जीवितहानी घडली नसली तरी कँटर आणि आंब्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने कँटर बाजूला करून वाहतुकीसाठी महामार्ग खुला करून दिला. सोमवारी मध्यरात्री हुबळी येथील हनगल येथून मुंबईकडे आंब्यांची वाहतूक करणारा कँटर निघाला होता. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हलगा गावानजीक असलेल्या सिमेंट गोडावूनजवळ खासगी आराम बसला बसणारी धडक चुकविण्याच्या प्रयत्नात कँटर चालकाने दुभाजकाला धडक दिली. यावेळी कँटरवरील चालकाचा ताबा सुटल्याने कँटर महामार्गावरच पलटी झाला. या अपघातात दोघांपैकी एक चालक जखमी झाला. अपघातात कँटरसह कच्च्या आंब्यांचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर कँटर रात्रभर महामार्गावरच पडून होता. सकाळी पोलिसांनी धाव घेऊन कँटर हटवून महामार्ग खुला केला.









