पीडित अल्पवयीन मुलीचे यापूर्वीही झाले होते अपहरण : आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या सहावर
बेळगाव : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणी आतापर्यंत तीन अल्पवयीनांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी एका कॅन्टीन चालकाला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. रवी सिद्धाप्पा नायकोडी (वय 34) असे त्याचे नाव आहे. नानावाडी रोडवर तो कँटीन चालवतो. 5 एप्रिल रोजी त्या अल्पवयीन मुलीला कारमधून घेऊन जाण्यासाठी मदत केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी रवीला अटक केली आहे. सावगाव रोडवरील एका फार्महाऊसमध्ये पंधरा दिवसांपूर्वी सामूहिक बलात्कार होण्याआधीही त्या मुलीचे अपहरण झाले होते, अशी माहिती उघडकीस आली आहे. मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे. केवळ पंधरा दिवसांपूर्वीच नव्हे तर 5 एप्रिल 2025 रोजीही कारमधून त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली असून, आरपीडी क्रॉसपासून कारमधून तिला नेण्यात आले होते. या प्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या सहावर पोहोचली आहे.









