काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे विधान
वृत्तसंस्था/ भोपाळ
राहुल गांधी यांची इच्छा नसल्यास त्यांना बळजबरीने काँग्रेसचा अध्यक्ष केले जाऊ शकत नाही. तसेच आम्ही त्यांच्यावर याकरता दबाव टाकू शकत नसल्याचे विधान काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी मंगळवारी केले आहे. यापूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे असे म्हटले होते. देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत. त्यांनी पद स्वीकारल्यास काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता आनंदी होणार असल्याचे गेहलोत यांनी म्हटले होते.
काँग्रेसमध्ये 20 सप्टेंबरपर्यंत अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे, परंतु अद्याप उमेदवारासंबंधी स्थिती स्पष्ट झालेली नाही. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाग न घेण्याचे संकेत दिले आहेत. 2019 मध्ये पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देणारे राहुल गांधी सातत्याने हे पद स्वीकारण्यास नकार देत आहेत. अलिकडेच त्यांनी पुन्हा एकदा ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिल्याचे काँगेसच्या नेत्यांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले आहे.
काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल गांधी यांना अध्यक्ष होण्याचे आवाहन सातत्याने करत आहेत. परंतु आमच्यापैकी कुणीच त्यांना अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी भाग पाडू शकत नाही. आम्ही सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत असे दिग्विजय सिंह म्हणाले.
काँग्रेस पक्षाचे भवितव्य उज्ज्वल असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करत अध्यक्षपद स्वीकारावे. राहुल गांधी अध्यक्ष न झाल्यास देशातील पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता निराश होणार असल्याची टिप्पणी गेहलोत यांनी केली आहे.









