वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महान फलंदाज सुनील गावसकरने चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधार संबोधले आहे. त्याच्यासारखा कर्णधार झाला नाही आणि त्याच्यासारखा कर्णधार भविष्यात कधी होणारही नाही, असे मत गावस्करने व्यक्त केले आहे.
12 रोजी चेन्नई येथे राजस्थान रॉयल्सविऊद्धच्या सामन्यात 41 वर्षीय धोनीने ‘सीएसके’चा कर्णधार म्हणून 200 सामने पूर्ण केले. सदर सामन्यात त्यांचा तीन धावांनी पराभव झाला. हा भारताचा माजी कर्णधार ‘आयपीएल’च्या इतिहासातील असा टप्पा गाठणारा पहिला खेळाडू बनला आहे.
कठीण परिस्थितीतून कसे बाहेर पडायचे हे ‘सीएसके’ला माहीत आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वामुळे हे शक्य झाले आहे. 200 सामन्यांत नेतृत्व करणे खूप कठीण आहे. इतक्या सामन्यांत नेतृत्व करणे हा मोठा भार झाला आणि त्यामुळे त्याच्या कामगिरीवरही परिणाम होऊ शकला असता, असे स्वत: भारताचा माजी कर्णधार असलेल्या गावस्करने म्हटले आहे. पण माही वेगळी आहे. तो वेगळा कर्णधार आहे, असे गावस्करने म्हटले आहे.
दोन वर्षे (2016 व 17) ‘चेन्नई सुपर किंग्स’ला त्यांच्या अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीर कारवायांमुळे निलंबित करण्यात आले होते. ती दोन वर्षे वगळता धोनी ‘आयपीएल’च्या सुऊवातीपासून संघाचा भाग राहिलेला आहे. 2016 च्या मोसमात त्याने 14 सामन्यांमध्ये नंतर अस्तित्व मिटलेल्या ‘रायझिंग पुणे सुपरजायंट्स’चे नेतृत्व केले होते. ते जमेस धरता कर्णधार म्हणून तो खेळलेल्या एकूण सामन्यांची संख्या 214 वर जाते. धोनीच्या नेतृत्वाखालील ‘सीएसके’ने चार वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. 12 एप्रिलपर्यंतची आकडेवारी पाहता कर्णधार म्हणून त्याने 120 विजय नोंदविलेले आहेत, 79 पराभव स्वीकारलेले आहेत आणि एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही. दरम्यान, या मोसमातील आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाला चांगली सुऊवात करून दिल्याबद्दल गावस्करने स्टार फलंदाज विराट कोहलीचे कौतुक केले आहे. विराट कोहली ‘आरसीबी’च्या डावाला धडाकेबाज सुरुवात करून देत आहे. ‘आरसीबी’ची सुरुवात चांगली होण्याचे आणि त्यांच्याकडून चांगली धावसंख्या नोंदविली जाण्याचे श्रेय विराटला जाते. ‘आरसीबी’साठी हे चांगले लक्षण आहे, असेही गावस्करने म्हटले आहे









