वार्ताहर/उचगाव
काश्मीरमधील पहलगाम येथे भ्याड हल्ला करताना दहशतवाद्यांनी निरपराध भारतीय पर्यटकांची क्रूर हत्या केली. या घटनेमुळे प्रत्येक भारतीय हेलावून गेला आहे. अशा या घटनांना पायबंद घातला पाहिजेत. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी दहशतवाद संपवलाच पाहिजे, अशा देशप्रेमाच्या आणि दहशतवाद विरोधाच्या तीव्र भावना घेऊन उचगाव ग्रामस्थांनी सोमवारी रात्री मूकमोर्चासह कॅण्डल मोर्चा काढला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मूक मोर्चामध्ये ग्रा. पं. अध्यक्षा, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी आणि गावातील नागरिकांनी भाग घेतला होता.
हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली
उचगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच देशात झालेल्या या घटनेचा तीव्र निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या कॅण्डल मूक मोर्चाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी आतंकवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला.









