सर्वखाप महापंचायतीचा निर्णय : 28 रोजी महिला महापंचायत
वृत्तसंस्था/ रोहतक
भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्लीत धरणे धरणाऱ्या कुस्तीपटूंच्या बाजूने रविवारी हरियाणामध्ये सर्वखाप महापंचायत झाली. रोहतकमधील महाम चौबिसीच्या ऐतिहासिक व्यासपीठावर आयोजित या महापंचायतीला हरियाणा आणि उत्तर प्रदेश व्यतिरिक्त इतर राज्यांतील खाप प्रतिनिधीही सहभागी झाले होते. सकाळी 11 वाजता सुरू झालेली महापंचायत सायंकाळपर्यंत सुरू होती. याप्रसंगी कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ 23 मे रोजी दिल्लीत कँडल मार्च काढण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. सायंकाळी 5 वाजता इंडिया गेट येथून काढण्यात येणाऱ्या या कँडल मार्चमध्ये देशभरातून लोक पोहोचतील. तसेच 28 मे रोजी नवीन संसद भवनात खाप समुदायाची महिला महापंचायत होणार आहे. या बैठकीसाठी देशभरातील महिलांशिवाय खाप आणि शेतकरी नेतेही पोहोचणार आहेत. रोहतकमधील रविवारच्या सर्वखाप महापंचायतीत डब्ल्यूएफआयचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांची नार्को टेस्ट करण्याची मागणीही करण्यात आली. नार्को टेस्ट झाल्यानंतर लोकांचा संभ्रम दूर होऊन त्यांना अटक करता येईल, असे याप्रसंगी सांगण्यात आले. यापूर्वी खाप पंचायतींनी 7 मे रोजी जंतरमंतरवर बैठक घेऊन ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारला 20 मेपर्यंतची मुदत दिली होती. ही मुदत पूर्ण होऊनही केंद्र सरकार किंवा दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतरच रविवारी रोहतकच्या महाम चौबिसी चबुतऱ्यावर सर्वखाप महापंचायत बोलावण्यात आली होती.









