बेरोजगार युवक संघर्ष समिती बेळगाव जिल्हा शाखेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन
बेळगाव : राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर त्वरित नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी बेरोजगार युवक संघर्ष समिती बेळगाव जिल्हा शाखेने केली आहे. शाखेच्या सदस्यांनी बुधवार दि. 8 रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी निवेदनाचा स्वीकार केला. राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये 2.86 लाखांहून जागा रिक्त आहेत. शिक्षण, आरोग्य, वसती, इंधन यासारख्या मूलभूत क्षेत्रात आवश्यकतेनुसार जागांची नेमणूक झालेली नाही. या जागांवर कायमस्वरुपी नेमणूक करण्याऐवजी रोजंदारीवर किंवा कंत्राटी पद्धतीने अथवा अतिथी यासारख्या पद्धतीने कर्मचाऱ्यांची नेमणूक करून त्यांच्याकडून दैनंदिन काम करून घेण्यात येत आहे.
वयोमर्यादेमध्ये 5 वर्षांपर्यंत शिथिलता देण्यात यावी
पदवी, पदव्युत्तर, एम. फील, पीएच. डी. शिक्षण घेतलेले हजारो उमेदवार आहेत. पण त्यांना रोजगार नसल्याने बेरोजगार म्हणून जीवन जगावे लागत आहे. रिक्त जागांवर त्वरित नेमणूक, किमान वयोमर्यादेमध्ये 5 वर्षांपर्यंत शिथिलता देण्यात यावी. शाळांमधून संगीत शिक्षक, चित्रकला शिक्षक, क्रीडा शिक्षकांची नेमणूक करावी. केपीएससीमध्ये भ्रष्टाचार सुरू असून याची चौकशी करावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.









