कला महाविद्यालय प्राचार्यपदासाठी जीपीएससीचा अजब निकष
प्रतिनिधी/ पणजी
सरकारी नोकरीत एखाद्या बडय़ा हुद्यावर नियुक्तीसाठी उमेदवार केवळ शैक्षणिक व अनुभवदृष्टय़ाच पात्र असून चालत नाही तर त्याचे व्यक्तीमत्व चांगले हवे तसेच त्याच्यात आत्मविश्वासही हवा, असा अजब निकष लावून खुद्द जीपीएससीकडून एका उमेदवारास डावलण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
गोवा कला महाविद्यालयात गेल्या सुमारे चार वर्षांपासून रिक्त असलेल्या प्राचार्यपदासाठी मुलाखत दिलेल्या शिवाजी शेट या उमेदवाराच्या बाबतीत हा प्रकार घडला असून एकाच पदासाठी अनेकदा मुलाखती देऊनसुद्धा दरवेळी त्यांना डावलण्यासाठी नवनवीन अटी शर्ती लादून त्यांची निवड लांबणीवर टाकण्याचे प्रयत्न होत आहेत, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या स्वाती केरकर यांनी केला आहे.
पणजीत आझाद मैदानावर शनिवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्याप्रकरणी आता राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना निवेदन सादर केले असून सदर उमेदवारास न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.
राज्यातील कलेचे विद्यामंदिर असलेले कला महाविद्यालय गेल्या चार वर्षांपासून प्राचार्याविना कार्यरत आहे. त्यामुळे तेथील प्रशासन पार कोलमडले आहे. गोवा विद्यापीठाशी संलग्न आणि पदवीपर्यंतचे शिक्षण देणाऱया एका महाविद्यालयासाठी तब्बल चार वर्षे प्राचार्य नसणे म्हणजे सरकारसाठी शरमेची बाब आहे. त्या पदासाठी शिवाजी शेट हे एकमेव पात्र उमेदवार असले तरी सरकारला ते नको आहेत. त्यामुळेच त्यांना डावलून स्वमर्जीतील अन्य उमेदवाराची नियुक्ती करण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या अटी, शर्ती लादून सरकार वेळकाढू धोरण अवलंबत आहे, असा आरोप केरकर यांनी केला.
कला क्षेत्रातील डॉक्टरेट मिळविणारे पहिले आणि एकमेव गोमंतकीय असलेल्या शिवाजी शेट यांच्याकडे सदर पदासाठी आवश्यक असलेले सर्व पात्रता निकष आहेत. तरीही त्यांच्यावर अन्याय करण्यात येत आहे. आता तर जीपीएससीने अज्ञानपणाची परिसिमा गाठली असून सदर पदासाठी ‘व्यक्तिमत्व’ आणि ‘आत्मविश्वास’ आदी निकष लावले आहेत. यावरून हे सर्व काही जाणीवपूर्वक करण्यात येत असल्याचे सिद्ध होत आहे. अशाप्रकारे सरकारी पदासाठी ‘सुंदरता’ हा निकष कसा काय लावला जाऊ शकतो? तसेच अशा प्रकारचे निकष इतरांना लावणारे जीपीएससीचे अध्यक्ष नोरोन्हा हे स्वतः ‘रुपवान’ आहेत का? असे सवाल केरकर यांनी उपस्थित केले आहेत.









