ब्रिटनमध्ये संशोधन यशस्वी, रुग्णांना मोठा दिलासा मिळणार
वृत्तसंस्था / लंडन
ब्रिटीश सरकारच्या आरोग्य सेवा विभागाने कर्करोगावरील महत्वाच्या संशोधनात यश मिळविले आहे. अवघ्या सात मिनिटांमध्ये कर्करोगावरील उपचार या संशोधनामुळे साध्य होणार आहेत. या संशोधनाला ब्रिटीश सरकारने मान्यता दिली असून लवकरच ब्रिटनमधील हजारो कर्करोग रुग्णांवर हे उपचार केले जातील. कर्करुग्णांसाठी हे मोठेच वरदान मानले जात असून नजीकच्या भविष्यकाळात हे उपचार सर्व जगात उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
‘अॅटेझोलीझुमाब’ असे या उपचारपद्धतीचे नामकरण करण्यात आले असून या पद्धतीत कर्करोगग्रस्तांच्या त्वचेखाली एक इंजेक्शन दिले जाते. यामुळे कर्करोग निर्माण करणाऱ्या पेशींची वाढ थांबते आणि रुग्ण कमी वेळेत बरा होतो. हे इंजेक्शन अवघ्या सात मिनिटांमध्ये दिले जाणे शक्य असल्याने डॉक्टरांना दिवसभरात पूर्वीपेक्षा बऱ्याच अधिक रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे.
मोठीच सोय होणार
या औषधाला टेसेन्ट्रिक असेही नाव आहे. रुग्णाच्या शीरेत हे औषध सोडण्यात येते. रुग्णाची शीर सापडण्यास वेळ लागला तर उपचारासाठीचा वेळ अर्ध्या तासापर्यंत वाढू शकतो. मात्र, कोणत्याही परिस्थितीत सध्याच्या उपचारपद्धतीत जितका वेळ लागतो, त्यापेक्षा कितीतरी कमी वेळ या नव्या उपचारपद्धतीसाठी लागणार असल्याने डॉक्टरांची आणि रुग्णांची मोठीच सोय होणार आहे.
जेनेन्टेक कंपनीचे संशोधन
हे औषध ब्रिटीश सरकारच्या आरोग्य सेवेसंबंधित असलेल्या ‘जेनेन्टेक’ कंपनीने शोधून काढले आहे. हे इम्युनोथेरपी श्रेणीतील औषध असून त्याचा त्वरित परिणाम होतो. कर्करोग निर्माण करणाऱ्या पेशींची वाढ थांबविणे आणि त्यांचा नाश करणे ही कार्ये या औषधाकडून नेहमीपेक्षा कमी वेळात केली जातात.
10 वर्षांपासून संशोधन
या कमी वेळेच्या उपचारापद्धतीच्या शोधासाठी गेली दहा वर्षे प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांमध्ये ब्रिटनमधील विविध आरोग्य संस्था आणि औषधनिर्मिती संस्थांनी आपले योगदान दिले. नुकतीच या पद्धतीची माहिती प्रसिद्ध करण्यात आली. हे आधुनिक तंत्रज्ञान असून ते अधिक सुलभ असल्याचे स्पष्ट केले गेले.
अनेक प्रकारांच्या कर्करोगावर उपयुक्त
फुप्फुसाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग, यकृताचा कर्करोग आणि पित्ताशय किंवा मूत्राशयाचा कर्करोग अशा विविध कर्करोगांवर हे औषध उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे उपचारांचा खर्चही कमी होऊ शकतो. तसेच रुग्णांच्या यातना कमी होतात. कर्करोग बरा होण्याचे प्रमाणही वाढू शकते, असे स्पष्ट करण्यात आले.
3,600 रुग्णांवर उपचार
प्रथम टप्प्यात या औषधाच्या साहाय्याने ब्रिटनमधील 3,600 कर्करोग रुग्णांवर उपचार केले जातील. त्यांची विभागणी विविध श्रेणींमध्ये करण्यात आली आहे. प्रतिवर्षी पाच ते सहा हजार रुग्णांवर उपचार करण्याची योजना आहे. काही वर्षांनंतर हे औषध इतर देशांमध्येही उपलब्ध केले जाण्याची शक्यता आहे.
नव्या शोधामुळे मोठीच सोय
ड कर्करोगावरील (कॅन्सर) नव्या संशोधनामुळे उपचारपद्धतीत क्रांती शक्य
ड इंजेक्शन देण्याचा वेळ वाचल्याने अधिक रुग्णांवर उपचार करण्यास वेळ
ड प्रथम ब्रिटनमध्ये उपचार होणार, कालांतराने जगासाठीही उपलब्ध होणार









