राज्य सरकारचा पुढाकार : रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न
प्रतिनिधी/ बेळगाव
कॅन्सरबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असताना रुग्णांना उपचार मिळणे कष्टदायी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांना पहिल्या टप्प्यात उपचार मिळावेत आणि तो बरा व्हावा या उद्देशाने जिल्हा रुग्णालयामध्ये कॅन्सर विभाग सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर बेळगाव जिल्हा रुग्णालयासह दहा जिल्ह्यात कॅन्सर उपचार केंद्रे सुरू केली जाणार आहेत.
सध्या केवळ बेंगळूर, मंड्या आणि गुलबर्गा येथे कॅन्सर रुग्णालय सुरू आहे. या रुग्णालयांमध्ये दुर्गम जिल्ह्यांतील रुग्ण येऊ शकत नाहीत. त्यामुळे राज्यातील 10 जिल्ह्यांत कॅन्सर विभाग सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरवर्षी कॅन्सर रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. त्यामुळे सरकारने गुलबर्गा हॉस्पिटलचा दर्जा वाढविण्यासाठी पावले उचलली आहेत. बेंगळूरमधील किडवाई हॉस्पिटलमध्ये यावर्षी 26 हजार कर्करोग रुग्णांनी उपचारासाठी नोंदणी केली आहे. दररोज 300 रुग्ण केमोथेरपी आणि 300 हून अधिक रुग्ण रेडिओथेरपी घेत आहेत. किडवाई हॉस्पिटलच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांना प्रशिक्षण देऊन जिल्हा रुग्णालयांना आवश्यक उपकरणे व सुविधा देऊन विभाग सुरू केले जाणार आहेत. कॅन्सर रुग्णांना पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात केमोथेरपीद्वारे उपचार केले जातात.
येथे सुरू होणार कॅन्सर विभाग
सुरुवातीला बेळगाव, बळ्ळारी, रायचूर, कोप्पळ, म्हैसूर, मंगळूर, शिमोगा, दावणगेरी, विजापूर, कारवार या जिल्हा रुग्णालयात कॅन्सर विभाग सुरू करण्यासाठी आवश्यक माहिती देण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. त्यानुसार या दहा जिल्ह्यांतील काही जिल्हा रुग्णालयांतून वैद्यकीय शिक्षण विभागाला आवश्यक माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे काही दिवसात कॅन्सर विभाग सुरू होणार आहेत. हे विभाग व्यवस्थितरीत्या चालल्यास दुसऱ्या टप्प्यात उर्वरित जिल्ह्यांमध्येही ते सुरू केले जाणार आहेत.









