विकास भगत यांची मागणी : मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात केल्याचा आरोप, केंद्राला पत्र पाठवणार
प्रतिनिधी / पणजी
मुरगाव मतदारसंघातील जनता कोळसा प्रदूषणामुळे त्रस्त असतानाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारकडून कोळसा हाताळणीला पाठबळ दिले जात आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 11 नोव्हेंबर 2020 मध्ये कोळसा हाताळणी कमी करण्यात येईल, असे आश्वासन जनतेला दिले होते. तरीही सातत्याने कोळसा हाताळणीमध्ये वाढ होत आहे. सुरुवातीला 7 टन कोळसा हाताळणी होत होती. त्यानंतर त्यात वाढ होऊन 13 टन केली गेली. आता 19.5 टन कोळसा हाताळणीसाठी पर्यावरण परवाने व इतर महत्त्वाचे परवाने एमपीटीला दिले आहेत. त्यामुळे दिलेले सर्व परवाने रद्द करून गोमंतकीयांचे हित जपावे, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाच्या पर्यावरण विभागाचे संयोजक विकास भगत यांनी पत्रकार परिषदेत केली.
विकास भगत यांनी सांगितले की, राज्याच्या पर्यावरणहितासाठी आवाज उठवला गेल्यास सरकारकडून वारंवार दाबला जात आहे. आतापर्यंत आपल्यावर अनेक खोट्या तक्रारी दाखल करून सरकारने आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण गप्प बसणार नसून, गोव्याचे पर्यावरण व गोंयकारपण टिकण्यासाठी गोवा फॉरवर्ड पक्ष आपली भूमिका सोडून बाजूला हटणार नाही. कोळसा प्रदूषणावर वारंवार आवाज उठवणारे मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर हेही मूग गिळून गप्प आहेत. कोळसा प्रदूषणाचा मुद्दा घेऊन लढलेले आमोणकर यांना आता मुरगावच्या जनतेची काळजी नसल्याचे दिसून येते, असा आरोपही त्यांनी केला.
मुख्यमंत्री सावंत यांनी गोव्याच्या हिताविऊद्ध अनेक निर्णय घेतले. हे निर्णय घेताना ते दिल्लीतील नेत्यांपुढे झुकतात, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. कोळसा हाताळणीसाठी दिलेली परवानगी ही आर्थिक लाभासाठीच असावी, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. मुरगाव मतदारसंघातील अनेक लोकांना कोळसा प्रदूषणामुळे प्राणास मुकावे लागले. अनेकांना श्वसनाचा त्रास होत आहे, तरीही या सरकारला येथील जनतेचे काहीच पडून गेलेले नाही. कोळसा हाताळणीसाठी पुन्हा परवानगी दिल्याने 19.5 टन कोळसा हाताळणी झाल्यास त्याचा गंभीर परिणाम येथील लोकजीवनावर होणार असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
कोळसा मुद्दा पेटणार
मुरगाव बंदरावर सरकारने दिवसाला 19.5 टन कोळसा हाताळणीसाठी दिलेली परवानगी मागे घ्यावी, यासाठी पर्यावरणीय संस्थां तीव्र विरोध करण्याची शक्यता आहे. याबाबत गोवा फॉरवर्ड पक्षानेही विविध संस्थांशी बैठक घेण्याची तयारी चालवली असल्याने कोळसा प्रदूषण व कोळसा हाताळणीसाठी दिलेली परवानगी हा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे. गोवा फॉरवर्ड पक्षातर्फे कोळसा हाताळणीसाठी पूर्णपणे विरोध केला असून, पक्षातर्फे केंद्रीय मंत्रालयाला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविणार असल्याचे विकास भगत यांनी सांगितले.









