फिजिकली हँडीकॅप्ड असोसिएशनच्या काही सदस्यांची मागणी
बेळगाव : अळवाण गल्ली शहापूर येथील फिजिकली हँडीकॅप्ड संघटनेने कुट्टलवाडी येथे काही वर्षांपूर्वी जमीन खरेदी केली होती. परंतु संघटनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांकडून या जागेत प्लॉट टाकून त्याची विक्री करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या जागेची एनए ऑर्डर रद्द करावी, अशी मागणी फिजिकली हँडीकॅप्ड संघटनेच्या काही सदस्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. फिजिकली हँडीकॅप्ड असोसिएशनने 2006 मध्ये कुट्टलवाडी येथे 6.28 एकर शेत जमीन खरेदी केली होती. या जागेवर वयोवृद्धांसाठी विविध प्रकल्प राबविण्यात येणार होते. परंतु सध्याच्या व्यवस्थापनाने या जागेला एनए करून त्याची विक्री करण्याचा घाट सुरू केला आहे. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना जास्त माहिती न देता अध्यक्ष व सेक्रेटरीकडून आपल्या पदाचा गैरवापर सुरू आहे. त्यामुळे हे प्रकार तात्काळ थांबवून या जागेच्या एनएची ऑर्डर रद्द करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी वाय. एन. बांदिवडेकर, डी. व्ही. पवार, अभिजीत बाळेकुंद्री, लक्ष्मीकांत पाटील, पी. के. मन्नूरकर यांच्यासह दिव्यांग उपस्थित होते.









