राष्ट्रीय शेतकरी संघटनेची मागणी : प्रादेशिक आयुक्तांना दिले निवेदन
बेळगाव : खासगी जय किसान भाजी मार्केटच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट करण्यात येत आहे. यासाठी त्यांचा परवाना रद्द करण्यासाठी अनेक वर्षांपासून लढा देण्यात येत आहे. मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांनी लवकरच परवाना रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही याची कार्यवाही झालेली नाही. परवाना रद्द करण्यास विलंब लावल्यास हजारो शेतकरी रस्त्यावर उतरून बेमुदत आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रीय शेतकरी संघाच्यावतीने देण्यात आला. याबाबतचे निवेदन प्रादेशिक आयुक्त जानकी के. एम. यांना देण्यात आले.
शहरातील खासगी जयकिसान भाजी मार्केटमध्ये योग्य वजन, किंमत व वेळही देण्यात येत नाही. यामुळे भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात येत आहे. तसेच छुपे खर्च आकारून शेतकऱ्यांकडून 8 ते 10 टक्के कमिशन घेण्यात येत आहे. त्यामुळे जयकिसान भाजी मार्केटचा परवाना रद्द करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून लढा दिला जात आहे. तसेच बेळगाव येथे झालेल्या गेल्या हिवाळी अधिवेशनावेळी हजारो शेतकरी एकत्र येऊन आंदोलन केले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची बैठक घेऊन 2 आठवड्यात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र याची अद्यापही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे जूनमध्ये शेतकऱ्यांनी कृषीमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले होते. यावेळी कृषीमंत्र्यांनी एका आठवड्यात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.
अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
मात्र यानंतरही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी जयकिसान भाजी मार्केटचा परवाना रद्द करावा. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.









