योग्य कामगारांना योजनांचा लाभ द्या : सीटूच्यावतीने खासदारांना निवेदन
बेळगाव : सरकारकडून बांधकाम कामगारांना अनेक सेवा-सुविधा व योजनांच्या माध्यमातून मदत देण्यात येत आहे. त्यामुळे या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक बोगस कामगार कार्डधारक निर्माण झाले आहेत. ग्राम पंचायत पातळीवर याचे सर्वेक्षण करून बोगस कामगार कार्डधारकांची कार्डे रद्द करण्यात यावीत. कामगारांच्या योजनांचा लाभ करून देण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी सीटूच्या नेतृत्वाखाली बांधकाम कामगारांकडून मोर्चा काढून खासदारांच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या नावे निवेदन देण्यात आले. राज्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार आहेत. या असंघटित कामगारांच्या हितासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. मात्र, योजनांचा लाभ प्रामाणिक कामगारांना होताना दिसत नाही. बोगस कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कामगारांच्या योजनांवर वेगळ्याच लोकांकडून डल्ला मारला जात आहे.
याचा परिणाम योग्य कामगारांवर होत आहे. यासाठी सरकारने कामगारांचा योग्य प्रकारे सर्व्हे करून बोगस कामगारांची कार्डे रद्द करावीत, अशी मागणी करण्यात आली. याबरोबरच कामगारांसाठी 29 नवीन कायदे तयार करण्यात आले आहेत. ते कायदे त्वरित मागे घ्यावेत. कामगारांच्या मुलांसाठी दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सुविधा, आर्थिक मदत, शिष्यवृत्ती आदी सुविधा त्वरित देण्यात याव्यात. कामगार कायद्यात बदल करून कामगारांवर अन्याय केला जात आहे. कायद्यातील बदल रोखण्यात यावा. कामगारांसाठी देण्यात येणारी पेन्शन, विवाहासाठी दिली जाणारी मदत आदी अर्ज निकालात काढण्यात यावेत. कामगार कल्याण खात्याकडून पारदर्शकपणे योजना राबविण्यात याव्यात, अशा विविध मागण्यांसाठी निवेदन सादर करण्यात आले. खासदार मंगला अंगडी यांच्यातर्फे त्यांच्या स्वीय साहाय्यकांनी निवेदन स्वीकारले. यावेळी जे. एम. जैनेखान, मंदा नेवगी, नागाप्पा संगोळ्ळी, दिलीप वारके, चंद्रकांत हलगरे, महादेव कोप्पद यांच्यासह अनेक कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.









