मुख्यमंत्री सिद्धरामया यांची अधिकाऱ्यांना सूचना : पात्र कुटुंबांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश
बेंगळूर : राज्यातील अपात्र बीपीएल कुटुंबांची रेशनकार्डे रद्द करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मात्र, पात्र असणाऱ्या कार्डधारकांना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. एखाद्या वेळेस पात्र असूनही बीपीएल रेशनकार्ड राहून गेल्यास त्यांना त्वरित कार्डे द्यावीत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दोन दिवसांपूर्वी गॅरंटी योजनांचा आढावा घेतला होता. यावेळी अन्नभाग्य योजनेत अपात्र लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आल्याची बाब त्यांनी गांभीर्याने विचारात घेतली आहे. त्यामुळे बुधवारी त्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची बैठक घेत अपात्र लाभार्थ्यांची बीपीएल कार्डे रद्द करण्याचे निर्देश दिले.
राज्यात अपात्र बीपीएल रेशन कार्डधारकांचा शोध घेण्यात आला आहे. यापैकी 3,65,614 कार्डे रद्द करण्यात आली आहेत तर काहींचे एपीएलमध्ये परिवर्तन करण्यात आले आहे. अन्नभाग्य योजनेंतर्गत तांदळासह पौष्टिक धान्य व आवश्यक आहार पदार्थ असणारे किट पुरविण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला तसेच अधिकाऱ्यांना या संदर्भात अधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्याची सूचना दिली.
रेशनधान्य वाहनांना जीपीएस
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील समुदायांना प्राधान्याने नवीन सरकारमान्य रेशन दुकाने देण्यासाठी पावले उचलावीत. आहारधान्य पुरवठा करणाऱ्या वाहनांना जीपीएस ट्रॅकर बसवावेत. सर्व गोदामांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी ठोस कार्यवाही करावी. तांदळाचा काळाबाजार रोखण्यासाठी सर्व तऱ्हेच्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. किमान आधारभूत दर योजनेंतर्गत प्राथमिक कृषी सहकारी संस्था व बचतगटांच्या सहकार्याने आहारधान्याची खरेदी प्रक्रिया करावी. यावेळी प्रथमच 0.29 लाख मेट्रिक टन तृणधान्य खरेदी केली जात आहे. खात्यातील रिक्त कर्मचारी पदे नेमणुकीसाठी आवश्यक पावले उचलली जातील, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.









