वन्यजीव-पर्यावरण विकास मंचची मागणी : प्रादेशिक आयुक्तांना निवेदन
बेळगाव : खानापूर तालुक्यातील भीमगड वन्यजीव अभयारण्यात 18 कि. मी. चा सफारी प्रकल्प केला जाणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी दिली आहे. मात्र याला वन्यजीव आणि पर्यावरण विकास मंचाने तीव्र विरोध केला आहे. शिवाय हा प्रकल्प थांबवावा, अशा मागणीचे निवेदन बेळगाव विभागीय प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टण्णावर यांना दिले आहे. भीमगड अभयारण्य हे सुरक्षित क्षेत्र आहे. यामध्ये विविध जातीचे वन्यप्राणी आणि इतर सजीव आहेत. शिवाय परिसरात लहान वाड्या, वसती आहे. अशा परिस्थितीत भीमगडमध्ये सफारी मोकळी केल्यास धोका निर्माण होणार आहे. वन्यप्राण्यासह येथील नागरिकांनाही याचा फटका बसणार आहे. केंद्र सरकारने 2011 मध्ये भीमगड हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केल्यानंतर या परिसरात कोणत्याही विकासकामांना बंदी घालण्यात आली आहे, असे असले तरी सफारी प्रकल्पाचा निर्णय घेण्यात आला आहे. याला वन्यजीव आणि पर्यावरण विकास मंचाने विरोध दर्शविला आहे.
प्रकल्पामुळे वन्यजीवांना धोका
या सफारी प्रकल्पामुळे वन्यजीवांना धोका आहे. शिवाय येथील जैवविविधताही नष्ट होणार आहे. नैसर्गिक पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी हा प्रकल्प थांबवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष सुरेश उरबीनट्टी, सचिव डी. एन. मिसाळे, जगदीश मठ्ठद, श्रीशैल मठ्ठद, रवींद्र कुलकर्णी, एम. बी. निर्वाणी आदी उपस्थित होते.









