कंग्राळी बुद्रुक येथील शेतकऱ्यांचे शेतीकडे जाणे मुश्कील : ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : त्वरित दुरुस्तीची मागणी
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
गावचे सांडपाणी वाहून जाणारा तलावानजीकचा कालवा फुटल्याने पायवाट बंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीकडे जाणे-येणे कठीण झाले आहे. कालव्याची दुरुस्ती तसेच सफाई कधी करणार? अशी विचारणा होत आहे. पीडीओ, ग्रा. पं. अध्यक्षा व सदस्यांनी त्वरित पाहणी करून फुटलेला कालवा बांधून शेतकरी वर्गाला दिलासा देण्याची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे सदर कालवा फुटला आहे. त्याचवेळी ग्रा. पं. ने कालव्याची सफाई केली असती तर ही परिस्थिती आली नसती. कालवा फुटल्यानंतर ग्रा. पं. अध्यक्षा व सदस्यांनी पाहणी केली. परंतु आता पाण्यामुळे शिवारातून जेसीबी मशीन आणता येत नाही.
पाऊस कमी झाल्यावर कालवा बांधण्याचे व सफाई करून सांडपाण्याचा निचरा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आश्वासन हवेतच विरले अन् कालवा दुरुस्तीचे काम झालेच नसल्याने शेतकऱ्यांनी आता कुणाकडे दाद मागावी, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. पूर्वी गावाजवळील तलावामध्ये सांडपाणी सोडले जात होते. पावसाळ्यात पाण्याने तलाव भरल्यास जादा पाणी कालव्यातून बाहेर जात होते. परंतु गेल्या सात-आठ वर्षापूर्वी गावाजवळील तलावाचे सौंदर्यीकरण करण्यात आले व सांडपाणी तलावामध्ये जाणे बंद करून थेट सदर कालव्यातून मार्कंडेय नदीला सोडण्याची व्यवस्था केली. परंतु कालव्यांची प्रत्येकवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी ग्रा. पं. ने साफसफाई करणे गरजेचे असते. तसे न झाल्यामुळे श्रीधर कोळी यांच्या शेताजवळ कालवा फुटून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
संपूर्ण गावचे सांडपाणी याच कालव्यातून
कंग्राळी बुद्रुक गावचे संपूर्ण सांडपाणी याच कालव्यातून वाहत असते. परंतु ग्रा. पं. या कालव्याच्या सफाईकडे दुर्लक्ष करत आहे. ग्रा. पं. ने या कालव्याकडे अगदी काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु ग्रा. पं. सदस्यांबरोबर अधिकारीसुद्धा सुस्त झाले असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व शेतकरी वर्गातून व्यक्त होताना दिसत आहेत. तेव्हा शासकीय अधिकारी, ग्रा. पं. अध्यक्षा, सदस्यांनी आतातरी जागे होऊन सदर कालव्याची बांधणी करून शेतकरी वर्गाला दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.
अन्यथा सांडपाणी तलावात सोडू
माजी ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी श्रीधर कोळी म्हणाले, तलावाला लागून माझी शेती आहे. तेथूनच सांडपाणी जाणारा कालवा आहे. कालव्याची सफाई न केल्यामुळे अवकाळी पावसाच्या पाण्याने कालवा फुटून आज दोन महेने होत आले. पीडीओ व सदस्यांच्या नजरेस ही बाब आणून दिली. परंतु अजून कालव्याची बांधणी झाली नाही. जर कालवा बांधून कालव्याची सफाई झाली नाही तर सांडपाणी तलावात सोडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
-श्रीधर कोळी









