वृत्तसंस्था / टोरँटो
कॅनडाचा अनुभवी आणि ज्येष्ठ टेनिसपटू 35 वर्षीय व्हॅसेक पोस्पिसीलने आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या टोरँटो आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत तो सहभागी होणार असून या स्पर्धेनंतर निवृत्तीची घोषणा करणार आहे.
आपल्या 18 वर्षांच्या व्यवसायिक टेनिस कारकिर्दीमध्ये पोस्पिसीलने 2014 साली विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत जॅक सॉक समवेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळविले होते. त्याच प्रमाणे 2022 साली डेव्हिस चषक स्पर्धा जिंकणाऱ्या कॅनडा संघामध्ये पोस्पिसीलचा समावेश होता. पुरुष दुहेरीच्या एटीपी मानांकनात पोस्पिसीलने चौथे स्थान तर एकेरीच्या मानांकनात 25 वे स्थान मिळविले होते. कॅनडातील होणाऱ्या टोरँटो टेनिस स्पर्धेत पोस्पिसीलला स्पर्धा आयोजकांनी वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश दिला आहे.









