वृत्तसंस्था / ओटावा
कॅनडामध्ये 28 एप्रिल 2025 या दिवशी संसदेची निवडणूक आयोजित करण्यात आली आहे. या निवडणुकीत भारत हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे, असा कांगावा त्या देशाच्या गुप्तचर संस्थांकडून केला जात आहे. तसा इशारा या संस्थांनी आपल्या सरकारला दिला आहे, असे वृत्त असून भारताप्रमाणे चीन, पाकिस्तान आणि रशिया यांच्याकडूनही या निवडणुकीवर परिणाम करण्यासाठी प्रयत्न केला जाण्याची शक्यता या संस्थांनी व्यक्त केली आहे अशी माहिती आहे.
सोमवारी एका पत्रकार परिषदेत कॅनडाच्या अधिकृत गुप्तचर संघटनेचे उपसंचालक व्हेनेसा लॉईड यांनी ही हस्तक्षेपाची शक्यता व्यक्त केली. भारत, चीन, पाकिस्तान आणि रशिया या हे चार देश कॅनडाच्या निवडणुकीवर परिणाम करु शकतात. या चारही देशांचे कॅनडात हितसंबंध आहेत. आपल्या हितसंबंधांना बाधा न पोहचविणारे सरकार त्यांना कॅनडात हवे आहे. यामुळे ते निवडणुकीच्या काळात कॅनडातील त्यांच्या हस्तकांना सक्रीय करु शकतात, असे प्रतिपादन त्यांनी केले.
मागच्या दोन निवडणुकांमध्येही…
2019 आणि 2021 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्येही भारत आणि चीन यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप तेथील गुप्तचरांनी केला होता. या प्रकरणी तेथील न्यायालयात दादही मागण्यात आली होती. तथापि, न्यायालयीन चौकशीत असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे कॅनडातील सर्वोच्च न्यायालयाने हे आरोप करणाऱ्या याचिका दोन वर्षांपूर्वीच फेटाळल्या होत्या.
एआयचा उपयोग होण्याची चिंता
या निवडणुकीचा परिणाम विशिष्ट प्रकारचा यावा, यासाठी चीनकडून कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाण्याची शक्यता लॉईड यांनी व्यक्त केली. चीन सोशल मिडियाचा उपयोग करुन या निवडणुकीत ‘फेक नॅरेटिव्ह’ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे, असा आरोप त्यांनी केला. भारतालाही कॅनडाच्या निवडणुकीवर प्रभाव टाकण्याची इच्छा आहे. कॅनडातील काही समाजघटकांना हाताशी धरुन भारताकडून या निवडणुकीच्या निर्णयावर परिणाम करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असे लॉईड यांचे म्हणणे आहे.
आरोप बिनबुडाचे आणि हास्यास्पद
कॅनडाच्या गुप्तचर संस्थांनी भारतावर केलेले आरोप बिनबुडाचे आणि कपोलकल्पित आहेत. त्या देशातील निवडणुकीचा भारताशी कोणताही संबंध नाही. उलट कॅनडानेच नेहमी भारताच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रकत्न करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतात काही वर्षांपूर्वी कृषी उत्पादनांसंबंधी केलेल्या कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. कॅनडाचे तत्कालीन नेते जस्टीन ट्रूडो यांनी या आंदोलनाला प्रकट समर्थन देऊन भारताच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये उघड हस्तक्षेप केला होता. आता हाच देश भारतावर असे आरोप करीत आहे या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून भारत अशा आरोपांचा कठोर शब्दांमध्ये निषेध करीत आहे, असे प्रतिपादन भारताने केले आहे.
अमेरिकेवर मात्र आरोप नाहीत
सध्या अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील मतभेद पराकोटीला पोहचले आहेत. आयातशुल्काच्या प्रश्नावर दोन्ही देशांचे नेते एकमेकांच्या विरोधात पवित्रे घेत आहेत. अशा स्थितीत कॅनडाची निवडणूक होत आहे. तथापि, या निवडणुकीत अमेरिकेचाही हस्तक्षेप होत आहे, असा कॅनडाचा आरोप नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठेच आश्चर्य व्यक्त केले जात असून एकंदरीतच कॅनडाच्या गुप्तचर संस्थेने केलेले आरोप हा निवडणूक स्टंटही असू शकतो, असे मत व्यक्त केले जाते. कॅनडातील ही निवडणूक अत्यंत चुरशीची आहे. सत्ताधारी लिबरल पक्षाला विरोधी पक्षाकडून तगडे आव्हान मिळत आहे. अशा स्थितीत काही बाबींचा लाभ उठविण्यासाठी असे आरोप केले जाऊ शकतात, अशी तज्ञांची भावना आहे.









