वृत्तसंस्था/ आँटेरिओ (कॅनडा)
2026 साली होणाऱ्या आयसीसीच्या पुरुषांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी कॅनडा संघाने आपले तिकीट आरक्षित केले आहे. ही स्पर्धा भारत आणि लंका यांच्या संयुक्त यजमान पदाने भरवली जाणार आहे. अमेरिका पात्र फेरी स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात कॅनडाने बहामासचा 7 गड्यांनी पराभव केला.
या पात्र फेरीच्या स्पर्धेतील कॅनडाचा हा सलग पाचवा विजय आहे. गेल्या वर्षी झालेल्या पुरुषांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कॅनडाचा समावेश होता. पुढील वर्षी होणाऱ्या पुरुषांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विद्यमान विजेता भारत, लंका, अफगाण, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, विंडीज, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, कॅनडा यांचा सहभाग राहिल. तर युरोप विभागातून दोन, आफ्रिका विभागातून दोन, आशिया ईएपी विभागातून तीन असे एकूण सात संघ पुढील वर्षीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होतील. युरोप विभागातील पात्र फेरीतील स्पर्धा 5 ते 11 जुलै दरम्यान तर आफ्रिका विभागाची पात्र फेरीची स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान तसेच आशिया ईएपी विभागाची पात्र फेरीची स्पर्धा 1 ते 17 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.
कॅनडा आणि बहामास यांच्यातील सामन्यात बहामासचा डाव 19.5 षटकात 56 धावांत आटोपला. कॅनडा संघातील फिरकी गोलंदाज कलिम सनाने 6 धावांत 3 तर शिवम शर्माने 16 धावांत 3 गडी बाद केले. त्यानंतर कॅनडाने 5.3 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात विजयाचे उद्दिष्ट पार केले. दिलप्रीत बाजवाने नाबाद 36 धावा जमविल्या.









