ट्रम्प यांच्या आयातशुल्काच्या प्रस्तावावर प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ ओटावा
अमेरिकेचे आगामी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडातून आयात होणाऱ्य सर्व सामग्रीवर 25 टक्के कर लादण्याची धमकी दिली होती. आता याच्या प्रत्युत्तरादाखल कॅनडातील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत आंsटेरियाने अमेरिकेच्या मद्यावर बंदी घालण्याची तयारी सुरू केली आहे. याचबरोबर अमेरिकेतील प्रांत मिशिगन, न्यूयॉर्क आणि मिनेसोटाला होणारी विजेची निर्यात रोखण्याचाही विचार केला जात आहे.
ओंटेरियोचे प्रीमियर डग फोर्ड यांनी याची पुष्टी दिली आहे. याचबरोबर ओंटेरिया अमेरिकेला होणाऱ्या महत्त्वपूर्ण खनिजांच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. यात शासकीय निविदेतून अमेरिकेच्या कंपन्यांना वगळण्याचीही तयारी सामील आहे.
हा आमचा अखेरचा पर्याय
आंsटेरियो प्रीमियर डग फोर्ड यांनी वीज न विकण्याचा निर्णय अखेरचा पर्याय असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेने जर आमच्या लोकांच्या रोजगाराला लक्ष्य केले तर आम्ही शक्य ते सर्व उपाय करू असा संदेश आम्ही देऊ इच्छितो. परंतु असे करण्याची वेळ आमच्यावर येणार नसल्याची आशा आहे असे फोर्ड यांनी म्हटले आहे. यावर ट्रम्प यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. फोर्ड यांनी अशाप्रकारचे पाऊल उचलले तर ठीक आहे, अमेरिका कॅनडाला सध्या अनुदान देत असून भविष्यात असे होऊ देणार नसल्याचे ट्रम्प यांनी इशारावजा सुरात सांगितले आहे. आंsटेरियाने मागील वर्षी अमेरिकेच्या 15 लाख घरांना वीज पुरविली होती.
ट्रम्प यांचा इशारा
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी मागील आठवड्यात फ्लोरिडात ट्रम्प यांच्यासोबत डिनर केला होता. यादरम्यान ट्रम्प यांनी कॅनडा सरकार अमेरिकेत अवैध स्थलांतरित आणि अमली पदार्थांचा प्रवेश रोखण्यास अपयशी ठरल्यास त्याच्यावर 25 टक्के आयातशुल्क लादणार असल्याचे म्हटले होते. याचदरम्यान ट्रम्प यांनी थट्टेच्या सुरात कॅनडाला अमेरिकेचा 51 वा प्रांत होण्याची ऑफर दिली होती.
अनुदान हवे असल्यास…
कॅनडाला अमेरिका दरवर्षी 100 अब्ज डॉलर्स तर मेक्सिकोला सुमारे 300 अब्ज डॉलर्सचे अनुदान देत आहे. आम्ही हे अनुदान रोखण्याची गरज आहे. या दोन्ही देशांना अनुदान हवे असल्यास त्यांनी अमेरिकेचा प्रांत व्हावे असे ट्रम्प यांनी एका मुलाखतीत म्हटले होते.
मेक्सिकोकडून प्रत्युत्तर
ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर मेक्सिकोच्या अर्थमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिकेत विक्री होणारे 88 टक्के पिकअप ट्रक हे मेक्सिकोतच निर्माण होतात. अमेरिकेच्या ग्रामीण भागांमध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते, जेथून ट्रम्प यांना मोठ्या प्रमाणात मते मिळाली आहेत. ट्रम्प यांनी मेक्सिकोतून आयात होणाऱ्या सामग्रीवर शुल्क लादलेतर या वाहनांच्या किमतीत 3 हजार डॉलरपर्यंत वाढ होऊ शकते. यामुळे अमेरिकेच्या कंपन्यांना नुकसान सहन करावे लागेल तसेच त्याच्या अर्थव्यवस्थेवरही प्रतिकूल प्रभाव पडणार असल्याचे मेक्सिकोच्या अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.









