वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मंगळवारपासून कॅलगेरी येथे सुरु होणाऱ्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या बॅडमिंटन टूरवरील सूपर 500 दर्जाच्या कॅनडा खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन हे आपला हरवलेला सूर मिळविण्यासाठी प्रयत्न करतील.
दुखापतीनंतर बॅडमिंटन क्षेत्रात पुनरागमन करणाऱ्या पी. व्ही. सिंधूला गेल्या काही आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी करता न आल्यामुळे तिचे महिला एकेरीच्या मानांकनातील स्थान घसरले आहे. सध्या ती 12 व्या स्थानावर आहे. पी. व्ही. सिंधूने यापूर्वी दोन वेळेला ऑलिम्पिक स्पर्धेत पदके मिळविली असून ती माजी विश्वविजेती आहे. पण गेल्या काही दिवसांच्या कालावधीत सिंधू आपली तंदुरुस्ती राखण्यासाठी झगडत असल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. 2024 साली होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रता प्रक्रियेमध्ये 27 वर्षीय सिंधूला निश्चितच दर्जेदार कामगिरी करावी लागेल. ऑलिम्पिक पात्रता प्रक्रियेच्या कालावधीला 1 मे 2023 पासून प्रारंभ झाला असून तो 28 एप्रिल 2024 पर्यंत राहिल. गेल्या वर्षी बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्यानंतर सिंधूला स्ट्रेस फ्रॅक्चरची समस्या झाली होती. तसेच गेल्या फेब्रुवारीमध्ये डोहा येथे झालेल्या आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक मिळविलेल्या भारतीय संघामध्ये सिंधूचा समावेश होता. त्यानंतर 2023 च्या बॅडमिंटन हंगामात तिला तंदुरुस्तीच्या समस्येमुळे विश्व बॅडमिंटन टूरवरील अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होता आले नाही. गेल्या एप्रिल महिन्यात झालेल्या माद्रिद मास्टर्स सुपर 300 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूने रौप्यपदक मिळविले होते. या स्पर्धेनंतर झालेल्या पुढील दोन स्पर्धांमध्ये तिला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता. कॅनडामध्ये सुरु होणाऱ्या या स्पर्धेत पी. व्ही. सिंधूचा सलामीचा सामना कॅनडाची एनजी टेलियाशी होणार आहे. जपानची ओकोहारा आणि सिंधू यांच्यात आतापर्यंत 17 सामने झाले असून त्यापैकी 9 सामने ओकाहाराने तर 8 सामने सिंधूने जिंकले आहेत. जपानच्या यामागुचीने गेल्या महिन्यात झालेल्या सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूचा पराभव केला होता. कॅनडातील या स्पर्धेत सिंधूला जपानच्या या दोन अव्वल स्पर्धकांशी मुकाबला करावा लागेल.
पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेन याच्या कामगिरीवर विशेष लक्ष ठेवले जाईल. अलिकडच्या कालावधीत लक्ष्य सेनलाही अनेक अव्वल स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी करता न आल्यामुळे त्याचे पुरुष एकेरीच्या मानांकनातील स्थान घसरले असून त्याला आता 19 व्या स्थनावर समाधान मानावे लागत आहे. यापूर्वी लक्ष्य सेनने मानांकनात पहिल्या 10 खेळाडुंमध्ये स्थान मिळविले होते. राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत लक्ष्य सेनने सुवर्णपदक मिळविले होते. गेल्या ऑगस्टमध्ये झालेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियशिप स्पर्धेनंतर लक्ष्य सेनच्या नाकावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतर त्याला त्याची प्रकृती वारंवार बिघडत गेल्याने त्याला अॅलर्जिच्या समस्येमुळे तब्बल 8 महिने बॅडमिंटन क्षेत्रापासून अलिप्त रहावे लागले होते. कॅनडातील या स्पर्धेत लक्ष्य सेनचा सलामीचा सामना थायलंडच्या द्वितीय मानांकीत व्हिटीडेसमशी होणार आहे. या स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीत प्रसाद गर्ग आणि पी. विष्णुवर्धक भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.









