वृत्तसंस्था/ओटावा
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी मागील वर्षी संसदेत खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरून भारताच्या विरोधात गरळ ओकली होती. तेव्हापासून भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडत चालले आहेत. आता पुन्हा एकदा ट्रुडो यांनी संसदेत उभे राहून भारताच्या विरोधात टिप्पणी केली आहे. ट्रुडो यांनी एका वृत्तअहवालाचा दाखला देत भारताने 2022 साली कॅनडातील विरोधी पक्ष कॉन्झर्वेटिव्ह पार्टीच्या नेत्याच्या निवडीत हस्तक्षेप केला होता, असा आरोप केला.
कॉन्झर्वेटिव्ह नेत्याच्या शर्यतीत भारतीय हस्तक्षेपाचे आरोप चिंताजनक असले तरीही नवे नाहीत, असे ट्रुडो यांनी हाउस ऑफ कॉमन्समध्ये बोलताना म्हटले आहे. कॅनडाच्या सरकारकडून मिळणाऱ्या निधीने चालणारे आउटलेट सीबीसी न्यूजने भारतावर हे आरोप केले होते. यात अज्ञात स्रोतांचा दाखला देत भारतीय हस्तकांनी पॅट्रिक ब्राउन यांना उमेदवारांच्या शर्यतीतून हटविण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. पॅट्रिक हे सध्या ब्रॅम्पटनच्या ग्रेटर टोरंटो एरिया टाउनशिपचे महापौर आहेत. भारतीय वाणिज्य दूतावासाच्या प्रतिनिधींनी ब्राउन यांच्या अभियानाच्या सह-अध्यक्ष मिशेल रेम्पेल गार्नर यांच्यावर पद सोडण्यासाठी दबाव टाकला होता, असे कॅनडा सरकारशी संबंधित आउटलेटने म्हटले आहे.
कॉन्झर्वेटिव्ह पार्टीच्या अंतर्गत निवडणुकीत पियरे पोलीवरे यांनी सहजपणे विजय मिळविला होता. त्यांना सुमारे 70 टक्के मते प्राप्त झाली होती. पोलीवरे या पदासाठी नेहमीच एक मजबूत दावेदार राहिले होते आणि ब्राउन यांना कधीच या पदाच्या शर्यतीत पाहिले गेले नव्हते. याचदरम्यान या आरोपांशी निगडित व्यक्तींनी ते फेटाळले आहेत. मी स्वत:च्या इच्छेने ब्राउन यांच्या अभियानापासून स्वत:ला वेगळे केले होते. कुठल्याही प्रकरणात कुठल्याही प्रकारे मला कुणाकडून भाग पाडण्यात आलेले नाही, असे गार्नर यांनी स्पष्ट केले आहे. भारताच्या हस्तक्षेपाद्वारे 2022 च्या कॉन्झर्वेटिव्ह पार्टी ऑफ कॅनडाच्या निवडणुकीचे निकाल बदलण्यात आले हे मानण्यासाठी माझ्याकडे कुठलेच कारण नसल्याचे ब्राउन यांनी म्हटले आहे.









