बेंगळूर, मुंबई, चंदीगडचा समावेश : 41 राजनैतिक अधिकाऱ्यांनाही हटवले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या महिन्यापासून कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंधांमध्ये तणाव आहे. याच तणावाच्या पार्श्वभूमीवर कॅनडाने भारतातून आपल्या 41 मुत्सद्दींना परत बोलावून सिंगापूर आणि मलेशियाला पाठवले आहे. तसेच, बेंगळूर, चंदीगड आणि मुंबईतील व्हिसा आणि वैयक्तिक कॉन्सुलर सेवा कॅनडाने तात्पुरत्या निलंबित केल्या आहेत. व्हिसा मागणाऱ्या लोकांना आता व्हिसा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिल्लीला जावे लागेल.
खलिस्तानी दहशतवाद्यांच्या मुद्द्यावरून वाढलेल्या तणावानंतर भारताने कॅनडातील व्हिसाची प्रक्रिया जवळपास एक महिन्यापूर्वी स्थगित केली होती. कॅनडाच्या सरकारने देखील आपल्या नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीसह गर्दीची ठिकाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. भारताने कॅनडाच्या राजनैतिकाला देश सोडण्यास सांगणे ही सामान्य घटना नाही. गेल्या 40-50 वर्षात अशी एकही घटना आठवत नाही, जिथे असे काही घडले असेल, असे कॅनडाच्या एका माजी मुत्सद्याने सांगितले.
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर दोन्ही देशांमधील राजनैतिक वाद आणखी वाढला आहे. ब्रिटिश कोलंबियातील सरे येथील गुरु नानक शीख गुरु द्वाराच्या पार्किंगमध्ये 18 जून रोजी निज्जर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर कॅनडाने निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला होता.
कॅनडाने आपल्या 62 पैकी 41 राजनयिकांना भारतातून हटवल्याच्या वृत्ताला कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलानी जोली यांनी दुजोरा दिला. सर्व कॅनेडियन राजनयिक आणि त्यांचे कुटुंब सुरक्षित असून त्यांनी भारत सोडला आहे. अशा प्रकारे मुत्सद्दींची राजनैतिक प्रतिकारशक्ती काढून टाकणे हे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात आहे. प्रकरण आणखी वाईट होऊ नये म्हणून, कॅनडाने कोणतीही सूड कारवाई न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी पुढे स्पष्ट केले. भारतानेही 21 मुत्सद्दी आणि त्यांचे कुटुंब वगळता सर्व कॅनेडियन मुत्सद्दींची राजनैतिक क्षमता कमी केली आहे. भारताच्या या निर्णयामुळे आता कॅनडानेही आपल्या अधिकाऱ्यांचा आकडा कमी केला आहे.
भारताशी संबंध कायम ठेवणार : कॅनडा
कॅनडा नेहमीच आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करेल, जो प्रत्येक देशाला लागू होतो. आम्ही भारतासोबतचे संबंधही कायम ठेवू. यावेळी, आमचे राजनैतिक अधिकारी एकमेकांच्या देशात उपस्थित राहणे आणि आम्ही प्रत्येक स्तरावर बोलू शकतो हे आमच्यासाठी सर्वात महत्वाचे आहे. पॅनडाचे 21 मुत्सद्दी अजूनही भारतात आहेत, मात्र 41 राजनयिकांनी माघार घेतल्याने कॅनडाला कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे आपल्या देशातील सेवा मर्यादित कराव्या लागतील, असे परराष्ट्रमंत्री जोली यांनी सांगितले.









