वृत्तसंस्था/ सेव्हिली (स्पेन)
येथे सुरू असलेल्या बिली जिन किंग चषक महिलांच्या सांघिक आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शनिवारी येथे झालेल्या लढतीमध्ये कॅनडाने झेक प्रजासत्ताकचा 2-1 शा फरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. त्याचप्रमाणे अन्य एका सामन्यात इटलीने स्लोव्हेनियावर मात करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. आता कॅनडा आणि इटली यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
कॅनडा आणि झेक प्रजासत्ताक यांच्यातील या लढतीमध्ये लैला फर्नांडीसने दर्जेदार खेळ करत आपल्या संघाला अंतिम फेरीत नेले. या लढतीतील पहिल्या एकेरी सामन्यात झेकच्या बार्बोरा क्रेसिकोव्हाने कॅनडाच्या स्टेकुसीकचा 6-2, 6-1 असा पराभव करत कॅनडावर आघाडी मिळविली. त्यानंतर दुसऱ्या एकेरी सामन्यात कॅनडाच्या लैला फर्नांडीसने झेकच्या व्होंड्रोसोव्हावर 6-2, 2-6, 6-3, अशी मात करत आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर दुहेरीच्या सामन्यामध्ये लैला फर्नांडीस आणि गॅब्रिएला डेब्रोवेस्की या जोडीने झेक प्रजासत्ताकच्या क्रिसिकोव्हो आणि सिनियाकोव्हा यांचा 7-5, 7-6 (7-3) असा पराभव केला.
दुसऱ्या उपांत्य लढतीत इटलीने स्लोवेनियावर मात करत अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे. या लढतीत इटलीच्या खेळाडूंनी पहिले दोन एकेरीचे सामने जिंकले. पहिल्या एकेरी सामन्यात इटलीच्या ट्रेव्हिसेनने स्लोवेनियाच्या जुवेनचा 7-6, 6-3 तर दुसऱ्या एकेरी सामन्यात इटलीच्या पाओलिनीने स्लोवेनियाच्या झिदानसेकचा 6-2, 4-6, 6-3 असा पराभव केला. गेल्या 10 वर्षांच्या कालावधीत इटलीने या स्पर्धेत पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे.









