भारतासोबत संबंध सुधारण्यासाठी उचलले पाऊल
वृत्तसंस्था/ओटावा
भारतासोबत संबंध सुधारण्याच्या दिशेने कॅनडाने गुरुवारी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. दोन्ही देशांदरम्यान उच्चायुक्त नियुक्त करण्यावर सहमती झाल्यावर आता कॅनडाने भारतान स्वत:च्या उच्चायुक्ताच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. कॅनडाने क्रिस्टोफर कूटर यांना भारतातील स्वत:चा नवा उच्चायुक्त नियुक्त केले आहे. कूटर यांनी यापूर्वी इस्रायलमध्ये चार्ज डी अफेयर्सच्या स्वरुपात जबाबदारी सांभाळली आहे. मागील वर्षी माजी उच्चायुक्त कॅमेरन मॅके यांनी पद सोडल्यापासून भारतात कॅनडाचा उच्चायुक्त नव्हता.
तर भारताने गुरुवारी वरिष्ठ मुत्सद्दी दिनेश पटनायक यांना कॅनडातील नवे उच्चायुक्त म्हणून नियुक्त केले. भारतीय विदेश सेवेच्या 1990 च्या तुकडीचे अधिकारी पटनायक लवकरच ओटावामध्ये कार्यभार स्वीकारणार आहेत. पटनायक हे सध्या स्पेनमध्ये भारताचे राजदूत आहेत. कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यंनी राजीनामा दिल्यावर सध्याचे पंतप्रधान मार्क कार्नी हे भारतासोबत संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. 2023 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारत सरकारच्या हस्तकाचा हात असल्याचा आरोप केला होता. तर भारताने त्यांचे हे आरोप फेटाळून लावले होते.









