काही दूतावास अधिकाऱ्यांना सिंगापूर, मलेशियाला पाठवले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
खलिस्तानी समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये वाद सुरूच आहे. दरम्यान, कॅनडाने भारतात काम करणाऱ्या बहुतांश दुतावास अधिकाऱ्यांना क्वालालंपूर (मलेशियाची राजधानी) आणि सिंगापूर येथे पाठवले आहे. भारताने अतिरिक्त राजदुतांना माघारी बोलावण्याची सक्त ताकीद दिल्यानंतर कॅनडाने हे पाऊल उचलले आहे. आम्ही भारतातील आमचे कर्मचारी तात्पुरते कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे स्पष्टीकरण कॅनडाने दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि कॅनडा या दोन देशांमध्ये काही मुद्द्यांवर तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. दोन्ही देशांमधील राजनैतिक संतुलनाबाबत सातत्याने चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीही भारताने कॅनडाला दुतावासातील अधिकारी आणि मुत्सद्द्यांची संख्या कमी करण्याची सूचना केली होती. भारताचे जितके मुत्सद्दी कॅनडात आहेत, तितकेच कॅनडाचे भारतात असावेत असे भारताचे म्हणणे आहे. भारताने कॅनडाला त्याच्या 41 मुत्सद्द्यांना माघारी बोलाविण्याची सूचना केली होती. त्यांना माघारी बोलाविण्यासाठी 10 ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. कॅनडाचे 62 मुत्सद्दी सध्या भारतात आहेत. त्यापैकी दिल्लीबाहेर भारतात काम करणाऱ्या बहुतांश कॅनेडियन मुत्सद्दींना क्वालालंपूर किंवा सिंगापूरला पाठवण्यात आले आहे, असे अहवालात म्हटले आहे.
कॅनडातील खलिस्तानवादी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची हत्या भारत सरकारच्या हस्तकांनी घडविल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी केला होता. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध तणावग्रस्त झाले आहेत. भारतानेही कठोर पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. “कॅनडाचे भारतात अधिक मुत्सद्दी आहेत. अशा परिस्थितीत समतोल निर्माण करण्याची गरज आहे. हे लोक आपल्या अंतर्गत व्यवहारातही ढवळाढवळ करतात. याबाबत आम्ही कॅनडासोबत चर्चा करत आहोत”, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरूवार, 5 ऑक्टोबर रोजी सांगितले होते.









