निज्जर हत्या प्रकरणात भारतीय उच्चाधिकाऱ्याचा दावा : कॅनडाच्या ‘कारवाई’वर नवा खुलासा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये राजनैतिक वाद निर्माण झाला होता. हा वाद अद्याप पूर्णपणे मिटलेला नाही. याचदरम्यान आता कॅनडातील भारतीय उच्चायुक्त संजयकुमार वर्मा यांनी केलेल्या दाव्याने पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला असून कॅनडाची कोंडी होण्याची शक्यता आहे. ‘निज्जर हत्या प्रकरणात भारताचा किंवा भारतीय अधिकाऱ्याचा हात असल्याचा आरोप करण्याचे निर्देश कॅनडातील उच्चस्तरीय गटातील व्यक्तीकडून आले होते’, असा गंभीर दावा वर्मा यांनी केला आहे.
खलिस्तान समर्थक दहशतवादी म्हणून भारतीय तपास यंत्रणांनी वाँटेड यादीत समाविष्ट केलेल्या हरदीप सिंग निज्जरची हत्या झाल्यानंतर या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत केला होता. तेव्हापासून या प्रकरणामुळे दोन्ही देशांमधले संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. भारत व कॅनडामधील संबंध ताणले जाण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या हरदीपसिंग निज्जर हत्या प्रकरणाची गेल्या सहा महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता भारताचे कॅनडातील उच्चाधिकारी संजय कुमार वर्मा यांनी गंभीर दावा केल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे.
कॅनडाच्या उच्चाधिकाऱ्यांवर आरोप
संजयकुमार वर्मा यांनी स्थानिक माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये कॅनडातील एका उच्चाधिकाऱ्यावर आरोप केले आहेत. या प्रकरणात भारताचा किंवा भारतीय अधिकाऱ्याचा हात असल्याचा आरोप करण्याचे निर्देश कॅनडातील उच्चस्तरीय गटातील व्यक्तीकडून आले होते, असा दावा वर्मा यांनी केला आहे. तसेच आतापर्यंत भारताच्या सहभागाबाबत कॅनडाने कोणतेही पुरावे पुरवलेले नाहीत, असेही त्यांनी सांगितले. पण या प्रकरणामुळे दोन्ही देशांमधले संबंध ताणले गेले असले तरी द्विपक्षीय व्यावसायिक संबंध अधिक विस्तृत करण्यासाठी भारत सकारात्मक असून त्यासाठीच्या तडजोडी करण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उच्चस्तरीय अधिकाऱ्याचे नाव गुलदस्त्यात
भारतीय उच्चायुक्त संजयकुमार वर्मा यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत निज्जर हत्येसंबंधी महत्त्वाचे भाष्य केले आहे. मी एक पाऊल पुढे जाऊन सांगू इच्छितो की, निज्जरच्या हत्येमागे भारत किंवा भारतीय एजंट आहेत, असे सांगण्याच्या सूचना उच्च पातळीवरून आल्याचे दिसते, असे ते म्हणाले. मात्र, त्यांनी थेट उच्चस्तरीय अधिकाऱ्याचे नाव घेतले नाही. अशा स्थितीत हा उच्चस्तरीय अधिकारी कोण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरने कॅनडाचे नागरिकत्व घेतले होते. सरेमध्ये राहून तो भारतविरोधी कारवाया करत होता. जूनमध्ये निज्जर याची गुरूद्वाराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सप्टेंबरमध्ये निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला. भारताने हे आरोप ठामपणे फेटाळून लावले असले तरी संसदेत ट्रुडो यांनी केलेल्या विधानावरून राजनैतिक वादाला सुरूवात झाली होती. आता भारतीय उच्चाधिकाऱ्यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला आहे.









